नाफेडमार्फत २४ रुपये दराने कांदाखरेदी योग्य नाही : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 06:33 PM2023-08-25T18:33:18+5:302023-08-25T18:34:58+5:30
श्री क्षेत्र वीर येथील विकास आराखड्याचे भूमिपूजन...
सासवड (पुणे) : ‘महाराष्ट्रात पिकणारा कांदा जगाच्या कानाकोपऱ्यात गेल्यास शेतकऱ्याला चार पैसे मिळतील. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा विचार केल्यास नाफेडमार्फत केली जाणारी २४ रुपये दराची खरेदी योग्य नाही,’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्री नाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टने बांधलेल्या सवाई मंगल कार्यालयाचे उद्घाटन तसेच नियोजित विकास आराखड्याच्या भूमिपूजनप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप व शशिकांत शिंदे, विजय कोलते, संभाजी झेंडे मान्यवर उपस्थित होते.
सदैव पवारसाहेबांसोबत : आमदार जगताप
आमदार संजय जगताप म्हणाले, ‘पवारसाहेबांच्या दूरदृष्टीपणामुळे पुरंदरमध्ये जानाई-शिरसाई व पुरंदर उपसा योजनांमुळे दुष्काळी भाग ओलिताखाली आला आहे. या सरकारने अनेक विकासकामे अडकून ठेवली आहेत. भविष्यात आम्ही सदैव पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहणार आहोत.’ अवस्था लक्षात घेऊन योग्य बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे राहणार आहेत, असा विश्वास आमदार संजय जगताप यांनी या वेळी दिला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मला अनेक वेळा मिळालेला संसदरत्न पुरस्कार हा माझा नसून, माझ्या मतदारांचा आहे.’
यावेळी आमदार शशिकांत शिंदे व हेमंतकुमार माहूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी स्वागत केले. अभिजित धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार अमोल धुमाळ यांनी आभार मानले. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.