आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान दिल्याने डॉ. भगवान पवार निलंबित
By राजू हिंगे | Published: May 24, 2024 07:31 PM2024-05-24T19:31:04+5:302024-05-24T19:31:16+5:30
आरोग्यमंत्री सह या विभागातील वरीष्ठांची मर्जी डावल्याने पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्यांना त्रास देेणे अशी प्रकरणे काढून निलंबित करण्यात आले
पुणे : महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॅा. भगवान पवार यांची बदली करण्यात आली होती. काही महिन्यापुर्वी या बदलीच्या विरोधात मॅटमध्ये जाऊन आरोग्य मंत्री यांच्या आदेशाला आव्हान दिले. मॅटने पवार यांची पुन्हा आरोग्य प्रमुखपदी नियुक्ती केली. त्यामुळे आरोग्य मंत्रीसह या विभागातील वरीष्ठांची मर्जी डावल्याने पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्यांना त्रास देेणे अशी प्रकरणे काढून निलंबित करण्यात आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. भगवान पवार यांची अवघ्या साडेतीन महिन्यात या पदावरून बदली करण्यात आली होती. ही बदली योग्य नसल्याचे कारण देत पवार यांनी मॅटकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आरोग्य मंत्र्यांच्या आदेशालाच आव्हान दिल्यामुळे काही महिन्यांपासून पवार यांनी ज्या ठिकाणी सेवा केली आहे. त्या सर्व ठिकाणी चौकशी करण्यात आली. यासाठी एक समिती गठित करण्यात आली. या समितीने चौकशी करुन पवार यांच्याविरोधात एक अहवाल राज्यसरकारला सादर केला. या अहवाला नुसार डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आले.
समितीच्या अहवालानंतर निलंबित
डॉ. पवार हे सातारा येथे आरोग्य अधिकारी असताना एका महिलेने कर्मचार्याने त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. आरोग्य खात्यामध्ये साहित्य खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यासर्व प्रकरणाची एप्रिल महिन्यामध्ये चौकशी करण्यासाठी मोठी समिती नेमण्यात आली. यासमितीने आरोग्य विभागाला अहवाल दिल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालय हे डॉ. भगवान पवार यांचे मुख्यालय राहणार आहे.