दोषारोपपत्र दाखल न केल्याने डॉ. बंगिनवार यांना डिफॉल्ट जामीन, 'आयओ'ला कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 09:49 AM2023-10-12T09:49:55+5:302023-10-12T09:50:26+5:30
दोषारोपपत्र वेळेत दाखल न झाल्याने न्यायालयाने तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुदाम पाचोरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे...
पुणे : पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखन न केल्याने पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बंगिनवार (रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) यांना डिफॉल्ट जामीन मंजूर झाला आहे. दोषारोपपत्र वेळेत दाखल न झाल्याने न्यायालयाने तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुदाम पाचोरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला आहे.
डॉ. बंगिनवार यांनी ॲड. सुधीर शहा आणि ॲड. सुहास कोल्हे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. महाविद्यालयात असलेल्या १५ टक्के व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळण्यासाठी २२ लाख ५० हजार रुपये शुल्क आहे. या व्यतिरिक्त १६ लाख रुपयांची मागणी त्यांनी एका विद्यार्थ्याच्या पालकांकडे केली होती. त्यातील १० लाख रुपये लाच स्वीकारताना त्यांना ८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी, त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते. पोलिसांनी ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे अपेक्षित असते. मात्र, ते दाखल न केल्याने बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर शहा आणि ॲड. सुहास कोल्हे यांनी डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला होता.