परस्पर ८ लाख रुपये लोन घेऊन तरुणीला गंडा!
By भाग्यश्री गिलडा | Published: October 12, 2023 03:08 PM2023-10-12T15:08:17+5:302023-10-12T15:08:41+5:30
वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांक धारकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पुणे: कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी वानवडी परिसरात राहणाऱ्या तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १८ ऑगस्ट २०२३ रोजी घडला आहे. याप्रकरणी वानवडी परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे तरुणीला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन येऊन जिओ कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या एचडीएफसी बँकेला लिंक असलेला जीव मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याचे तरुणीला सांगितले. त्यानंतर तरुणीला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. तक्रारदार तरुणीने अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर रिचार्ज संपला आहे असे सांगत रिचार्ज करण्याच्या बहाण्याने खासगी माहिती मिळवली. त्यानंतर तरुणीच्या बँक खात्यावर ८ लाखांचे लोन घेऊन त्यातील ५ लाख २० हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांक धारकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पटारे करत आहेत.