अलविदा रत्नागिरी हापूस...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:36 PM2018-06-04T14:36:32+5:302018-06-04T14:36:32+5:30
हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात मागली तीन आठवड्यांपासून सामान्यांच्या आवाक्यात भाव आले होते़.
पुणे: यंदाचा रत्नागिरी हापूसचा हंगामा अखेर संपला असून, सध्या शिल्लक असलेल्या मालाची विक्री केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पुणेकर रत्नागिरी हापूसच चव चाखत होते. दर वर्षीच्या तुलनेत यंदा रत्नगिरी हापूसची आवक अवघी २० ते ३० टक्के इतकीच राहिली. यामुळे ऐन हंगामात देखील रत्नागिरी आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला नाही. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात मागली तीन आठवड्यांपासून सामान्यांच्या आवाक्यात भाव आले होते़ याबाबत आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, गेल्या आठवड्यापासून बाजारात रत्नागिरीची आवक तुरळक प्रमाणात सुरु होती. परंतु, रविवारी ही आवक पूर्णपणे बंद झाली. ओखी वादळामुळे रत्नागिरी हापूसची आवक तुलनेत कमीच राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्नाटक हापूसचाही हंगाम उशिरा सुरु झाला आणि कर्नाटकमध्येही यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याच्या उत्पादनात घट झाली़. रविवारी कर्नाटक हापूसची वीस हजार पेट्यांची आवक झाली असून आणखी दहा दिवस कर्नाटक हापूसचा हंगाम सुरु राहील अशी माहिती व्यापारी रोहन उरसळ यांनी व्यक्त केली़.
गावरान हापूसला मागणी वाढली
गावरान हापूस आंब्याची आवक वाढली असून नागरिकांकडून मागणीही चांगली आहे. रविवारी मार्केटयार्डात हवेली आणि मुळशी तालुक्यातील गावातून नैसर्गिकरित्या पिकविलेल्या गावरान हापूसची १०० क्रेट इतकी आवक झाली़ प्रत्येक क्रेटमध्ये ७ डझन आंबे असतात़ प्रतिडझन आंब्यास दोनशे रुपये भाव मिळाला़ गावरान हापूस आंबा नैसर्गिक रित्या पिकविलेला असल्यामुळे चवीला गोड आहे़ येत्या आठवड्यात आणखी आवक वाढेल असा अंदाज व्यापारी तात्या कोंडे यांनी व्यक्त केला़ गावरान हापूसचा हंगाम ३० जुनपर्यंत सुरु राहील असेही त्यांनी सांगितले़