बाह्यवळणांची कामे दृष्टिपथात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:43+5:302021-06-04T04:09:43+5:30
राजगुरुनगर: खेड-सिन्नर महामार्गासह सहा बायपास कामांना मी केवळ मंजुरी मिळवली नाही, तर ही कामे सुरू होण्यासाठी त्यातील लहान-मोठे ...
राजगुरुनगर: खेड-सिन्नर महामार्गासह सहा बायपास कामांना मी केवळ मंजुरी मिळवली नाही, तर ही कामे सुरू होण्यासाठी त्यातील लहान-मोठे अडथळे दूर करून प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले. त्यामुळेच ही सर्व बाह्यवळणाची कामे दृष्टिपथात असून कामे वेगाने पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
खेड-सिन्नर महामार्गावर सुरू असलेल्या राजगुरुनगर शहर बायपास, मंचर शहर बायपास आदी कामांना शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत आढळराव-पाटील यांनी भेट देऊन आढावा घेतला. तसेच कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे, महिला आघाडी संपर्कप्रमुख विजया शिंदे, स्वर्गीय मा.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, विजयसिंह शिंदे, माजी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाण, टी अँड टी कंपनीचे व्यवस्थापक वाघ उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, आजवर आपण केलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणून ही सर्व बाह्यवळणांची कामे सुरू असून खेड घाट व नारायणगाव बायपास कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. हे दोन्ही बायपास लवकर पूर्ण होत असून उर्वरित राजगुरुनगर शहर, मंचर शहर, कळंब व आळेफाटा बायपासची कामे तत्परतेने पूर्ण होण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनी व अधिकारी वर्गाशी सातत्याने संपर्क सुरू आहे. राजगुरुनगर व मंचर बायपासचे काम करणाऱ्या टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड या ठेकेदार कंपनीचे काम अतिशय दर्जेदार व वेगवान असून राजगुरुनगर येथील नदीवरील मोठ्या पुलाचे काम अतिशय जलदगतीने जवळपास पूर्णत्वाच्या टप्प्यात आणले आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी या महामार्गाच्या मूळ ठेकेदारांच्या आर्थिक अडचणी व भूसंपादनातील अडथळे यामुळे बाह्यवळण कामांना होत असलेला विलंब लक्षात घेऊन सर्व बाह्यवळण कामे एकाच वेळी करणे शक्य नव्हते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून कामे तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे ठरले. त्यानुसार खेड घाट व नारायणगाव बायपासचा कामे प्राधान्याने सुरू करून घेतली, याशिवाय राजगुरुनगर व नारायणगाव शहरातील अंतर्गत रुंदीकरण कामांसाठी ३९ कोटी रुपये विशेष बाब म्हणून मंजूर करून घेतले. ही कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.
राजगुरुनगर शहर बायपास कामासाठी कांदा-लसूण संशोधन केंद्राची १.२० हेक्टर जागा संपादित होणे गरजेचे होते त्यासाठी दोन वर्षे केंद्रीय इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च विभाग नवी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून मंजुरी मिळवली. खासदार नसलो तरी मी मंजुरी मिळविलेली कामे पूर्णत्वास नेऊन या भागातील लोकांना दिलेला शब्द पूर्ण करणे हे माझे कर्तव्य समजतो.
शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी खासदार
०३ राजगुरुनगर
राजगुरुनगर येथे भीमा नदीवरील होणाऱ्या पुलाची पाहणी करताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व पदाधिकारी.