पॉलिमर स्वॅब निर्मितीत ‘सी-मेट’ला यश; कोरोना तपासणीला उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 01:42 AM2020-04-04T01:42:53+5:302020-04-04T06:32:30+5:30
चाचणीसाठी पाठवले बंगळुरूला
- राहुल शिंदे
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तपासणी संचामधील (टेस्टिंग कीट) अत्यंत महत्त्वाच्या ‘पॉलिमर स्वॅब’ची निर्मिती करण्यात पुण्यातील सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) मधील संशोधकांना यश आले आहे.
कोरोना तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणाºया तपासणी संचाची निर्मिती भारतात होत नाही. भारताला त्याची आयात करावी लागते. जगभरात लॉकडाउन असल्याने आयात -निर्यात ठप्प आहे. त्या पार्श्वभूमीवर सी- मेट मधील वरिष्ठ पॉलिमर शास्त्रज्ञ व या संशोधनामधील प्रमुख डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी वैशिष्ट्यपूर्ण पॉलिमरचा वापर करून तपासणी संचामधील महत्त्वाचा पॉलिमर स्वॅब विकसित केला आहे. त्याची चाचणी घेण्यासाठी बंगळुरू येथे पाठविला आहे.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, कोरोना तपासणी संचाची आयात प्रामुख्याने जर्मनी, इटली आणि अमेरिकेतून केली जाते. कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील द्र्रव पदार्थाचा नमुना घेण्यासाठी आवश्यक असणाºया पॉलिमर स्वॅबची निर्मिती ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे आम्ही या स्वॅबची निर्मिती केली आहे.
स्वदेशी बनावटीच्या व केंद्र शासनाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या निर्देशानुसार कृत्रिम व वैशिष्ट्यपूर्ण पॉलिमर पुढील चाचणीसाठी बंगळुरूला पाठविले आहे. आपल्याला नजिकच्या काळात सुमारे ४० लाख स्वॅबची आवश्यकता आहे. सी-मेट मध्ये थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने किफातशीर पॉलिमर स्वॅब विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
वैद्यकीय चाचण्यानंतर लवकरच पॉलिमर स्वॅबचे उत्पादन घेणे शक्य होईल, असा विश्वास ‘सी- मेट’ चे महासंचालक डॉ. मुनिरत्नम यांनी व्यक्त केला.
पॉलिमर स्वॅब निर्मिती संशोधन कार्यात बंगळुरू येथील डॉ. एच. श्रीधर, डॉ. एल. ज्योतिष कुमार, बंगळुरू येथील अॅडिव्हिट मॅन्युफॅक्चरिंग सोसायटी आॅफ इंडिया (एएमएसआय) यांचा सहभाग आहे.
-भारत काळे, संचालक, सी- मेट, पुणे