‘सी वॉच’च्या साह्याने ६३ गुन्हे उघडकीस : ७२ आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:20 PM2019-08-12T13:20:53+5:302019-08-12T13:30:21+5:30
सध्या शहरातील शासकीय सीसीटीव्ही आणि खासगी संस्था, व्यक्तींनी बसविलेल्या सीसीटीव्हींची संख्या तब्बल २८ हजार ६०० इतकी झाली आहे़...
पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्ह्यांचा माग काढण्यासाठी शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा पोलीस दलाला चांगला उपयोग होत आहे़ . खासगी व्यक्ती आणि संस्थांनी लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यात तब्बल ६३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे़. अशा गुन्ह्यांतील ५७ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे़ .
शहरातील दहशतवादी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी चौकाचौकात शासनाच्या वतीने सीसीटीव्ही बसविण्याची पहिली योजना राज्यात पुण्यात राबविण्यात आली़. त्याचा फायदा हळुहळू दिसून येऊ लागला असून वाहतूकीवर नियंत्रण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईबरोबरच गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो़. अनेक गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळण्यास या सीसीटीव्हीचा उपयोग झाला आहे़. त्यामुळे शहर पोलीस दलाने ‘सी वॉच’ हा उपक्रम हाती घेतला असून त्यात दुकानदार आणि सोसायट्यामधील नागरिकांच्या मदतीने सीसीटीव्ही बसविण्याला प्रोत्साहन दिले जात आहे़. सध्या शहरातील शासकीय सीसीटीव्ही आणि खासगी संस्था, व्यक्तींनी बसविलेल्या सीसीटीव्हींची संख्या तब्बल २८ हजार ६०० इतकी झाली आहे़.
काही महिन्यांपूर्वी मुंढवा परिसरात एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून दोघांनी खुन केला होता़. सी वॉच कॅमेऱ्याची पाहणी केल्यावर या दोघांची माहिती मिळाली़. खुन झालेल्याची ओळख पटेपर्यंत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. अशाच प्रकारच्या लष्कर आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खूनाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पौड रोडवरील केळेवाडीत झालेल्या एका खुनाचे आरोपी रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला होता़ .
काय आहे सी वॉच उपक्रम
संस्था, दुकानदार व वैयक्ति घरमालकांनी लावलेल्या सीसीटीव्हीतील कॅमेऱ्याचा एक अॅक्सेस जीओ टेक्निकद्वारे संबंधित पोलिस ठाण्याच्या किंवा मुख्य नियंत्रण कक्षाच्या सर्व्हरशी जोडला जातो़. कॅमेरे बसवताना रस्त्यावरील सर्व घटना अचूक टिपतील अशा पद्धतीने बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांच्या हालचाली या कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे यातील कोणतेही फुटेज पोलिसांना त्यांच्याकडे स्टोअर करण्याची गरज नाही. जेव्हा एखाद्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळते त्यानुसार पोलिस तो गुन्हा कोणत्या परिसरासह कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे हे पाहून तात्काळ त्या परिसरात ‘सी वॉच’ उपक्रमात सहभागी असलेलेल्या कॅमेऱ्यांची पाहणी केली जाते. त्यामुळे अनेकदा गुन्हा झालेल्या ठिकाणाची प्रत्यक्ष माहिती या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांना मिळते.
नुकताच पोलिस व्यापाऱ्याच्या मदतीने नेहमी शहरातील नागरिकांची वर्दळ असलेला लक्ष्मी रोड सी वॉच प्रकल्पाच्या नजरेत आणला आहे. यामुळे संपूर्ण लक्ष्मी रोड सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे. यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील गुन्हेगारीला प्रतिबंध करणे तसेच घडलेल्या घटनांवर लक्ष ठेवणे आता अधिक सोपे जाणार आहे.