Chartered Accountant: जिद्द, चिकाटी अन् प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शिपायाचा मुलगा बनला 'सीए'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:46 AM2022-07-19T11:46:50+5:302022-07-19T11:47:00+5:30
सीए परीक्षेचा सलग सहा वर्ष अभ्यास करत हे दैदिप्यमान यश संपादन करून गावातील पहिलाच सीए बनण्याचा मिळवला बहुमान
पाटेठाण : घरची परिस्थिती कोणत्याही स्वरुपाची असली तरी मुलांना स्पर्धा परीक्षांचे लागलेले व्यसन शांत बसू देत नाही. अभ्यासात सातत्य अंगी जिद्द, चिकाटी, प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीए (सनदी लेखापाल) परीक्षा पास होऊन शिक्षण संस्थेत शिपाई पदावर काम करणाऱ्या वडिलांचे दिवा स्वप्न पूर्ण करत गावातील पहिला सीए बनण्याचा मान मिळवला आहे. तो म्हणजे देवकरवाडी (ता.दौंड) येथील मयुर रोहिदास देवकर याने.
विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना संघर्षाची तयारी ठेवावी लागते. त्यातून यश नाही आले तर नैराश्य देखील येते. मुलांना यासाठी कौटुंबिक आधाराची फार मोठी गरज असते. देवकरवाडी (ता.दौंड) येथील कैलास शिक्षण संस्थेत शिपाई पदावर काम करत असताना रोहिदास देवकर यांनी देखील आपल्या मुलाच्या उज्वल भविष्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. अगदी शालेय जीवनापासूनच त्याच्या बौद्धिक क्षमतेला वाव देत ध्येयाप्रत नेण्याची भुमिका उत्तम प्रकारे पार पाडली आहे.
मयूर याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकरवाडी येथे झाले असून वाडे बोल्हाई सिद्धाचलंम चारीटेबल ट्रस्ट येथे माध्यमिक शिक्षण तर उच्च शिक्षण मॉडर्न कॉलेज पुणे येथे झाले आहे. सीए परीक्षेचा सलग सहा वर्ष अभ्यास करत दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे दैदिप्यमान यश संपादन करत गावातील पहिलाच सीए बनण्याचा बहुमान मिळवला आहे. यावेळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून यशाबद्दल संपूर्ण परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.