कॅब चालकाचे महिला प्रवाशाला नेताना अश्लील कृत्य; महिलेने २ किमी पळत जात दिली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:25 IST2025-02-27T09:22:07+5:302025-02-27T09:25:53+5:30
खडकी पोलिसांनी परप्रांतीय २० वर्षीय कॅबचालकास अटक केली आहे.

कॅब चालकाचे महिला प्रवाशाला नेताना अश्लील कृत्य; महिलेने २ किमी पळत जात दिली तक्रार
पुणे : शहरातील एका आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. या महिलेच्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. यामुळे आयटी कंपनीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी परप्रांतीय २० वर्षीय कॅबचालकास अटक केली आहे.
खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या ४१ वर्षीय महिला अभियंता यांनी तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने एका प्रसिद्ध ॲग्रीगेटर ॲपद्वारे कॅब बुक केली. कल्याणीनगर येथील आपल्या कार्यालयातून सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घरी जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. गाडी शहादावाल बाबा चौकात पोहोचली आणि संगमवाडी रोडमार्गे पाटील इस्टेट चौकाच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा चालकाने कारमधील मध्यभागी असलेला आरसा महिलेचा चेहरा दिसेल अशा पद्धतीने सेट केला. यानंतर तो आरशात महिलेला पाहून चालत्या गाडीत अश्लील कृत्य करू लागला. हा प्रकार बघून पीडित महिला घाबरली. कार एका सिग्नलपाशी थांबताच तिने दरवाजा उघडून बाहेर पळ काढला. यानंतर महिलेने २ किमी पळत थेट खडकी पोलिस ठाणे गाठले.
दरम्यान, कॅबचालकाने पुढे जाऊन महामार्गावर गाडी एका बाजूला थांबवली आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी महिलेकडून कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला. त्याआधारे कॅबमालकाचा शोध लागल्यावर चालकाला अटक करण्यात आली. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून, काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड येथे स्थलांतरित झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक चोरमोले यांनी दिली.