आयटी कंपनीतील तरुणीवर कॅब चालकाचा बलात्कार; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 08:56 PM2021-04-10T20:56:59+5:302021-04-10T20:57:12+5:30
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार
पुणे : आयटी कंपनीत नोकरी करणार्या एका तरुणीला ओला कॅबमध्ये बसल्यानंतर चालकाने गुंगी येणारे औषध टाकलेले पाणी पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणीचे अश्लील फोटो काढून ते सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खराडी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॅब चालक प्रमोद बाबू कनोजिया (रा. कर्वेनगर) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धायरी परिसरातील एका लॉजवर ४ ते ३० मार्च दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका आयटी कंपनीत नोकरी करते. तर, आरोपी हा ओला कॅबवर चालक आहे. ४ मार्च रोजी तरुणीने मांजरी परिसरातून घरी जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. त्यानुसार आरोपी हा कॅब घेऊन तरुणीला घेण्यासाठी आला. तरुणी मांजरी परिसरातून कॅबमध्ये बसली. त्यावेळी तरुणीला तहान लागली होती. तेव्हा कॅबचालकाने तरुणीला गुंगी येणारे औषध टाकलेले पाणी पिण्यास दिले. पाणी पिल्यानंतर तरुणीला गुंगी येऊन ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने तिला धायरी येथील गोकूळ लॉज येथे घेऊन गेला. त्यानंतर तरुणीने कपडे काढून तिचे काढून मोबाईलमध्ये फोटो काढले. काढलेले अश्लील फोटो सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लॉजवर घेऊन जात अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार झाल्यानंतर तरुणीने सुरूवातीला स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट पोलिसांनी या तरुणीला मुंढवा पोलिस ठाण्यात पाठवले. तरुणीने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर तरुणी कॅबमध्ये बसल्याचे ठिकाण हे हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे तो गुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.