काळ्या यादीत टाकल्याने कॅब चालकांचा साेमवारी संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 08:08 PM2018-03-18T20:08:35+5:302018-03-18T20:14:48+5:30
कॅब चालकांची अार्थिक परवड हाेत अाहे. त्यातच कंपनीकडून काळ्या यादीत टाकण्यात येत अाहे. त्यामुळे कॅबचालकांनी साेमवारी संप पुकारला अाहे.
पुणे : वाढत्या स्पर्धेमुळे कॅब चालकांचीही आता आर्थिक परवड होऊ लागली आहे. कर्जाने घेतलेल्या वाहनांची कर्जे फेडण्यापुरते पैसेही मिळत नसल्याचा दावा चालक करत आहेत. त्यातच प्रवासी वाहतुक करणाऱ्या खासगी कंपन्यांकडून काळ्या यादीत टाकले जात आहे. याच्या निषेधार्थ राज्यातील ओला, उबेर चालक उद्या (दि. १९) संपावर जाणार आहेत. पुणे शहरातील सुमारे २० हजारांहून अधिक कॅबचालक या संपात सहभागी होणार आहेत.
मागील काही वर्षांपासून ओला, उबेर या प्रवासी वाहतुक करणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पुण्यासह मुंबई, ठाणे व अन्य काही शहरांमध्ये रिक्षा, टॅक्साचालकांशी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे पुर्वी होणारा व्यवसाय व सद्यस्थितीतील व्यवसायात फरक पडला आहे. आता कंपन्यांच्या जोडल्या गेलेल्या कॅबचालकांना हा व्यवसाय परवडेना झाला असल्याचा दावा चालक करत आहेत. यापार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेने राज्यात सोमवारी कॅबचालकांचा संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासून कॅबचालक संप करून कंपन्यांचा निषेध करणार आहेत.
वाहतुक सेनेचे शहराध्यक्ष गणेश नाईकवडी म्हणाले, सुरूवातीच्या काळात ओला, उबेर या कंपन्यांनी अनेकांना गाड्या घेण्यास भाग पाडले. त्यावेळी चालकांना पैसेही चांगले मिळत होते. त्यामुळे अनेकांनी कर्ज काढून २ ते ३ गाड्या घेतल्या. मात्र, आता या वाहनांचे प्रमाण वाढल्याप्रमाणे रोजचा व्यवसाय घटला आहे. त्यातच कंपन्यांची मक्तेदारी वाढली आहे. छोटी कारणे सांगून चालकांना काळ्या यादीत टाकले जात आहे. व्यवसाय वाढल्याने कंपन्यांनी स्वत:च गाड्या घेतल्या आहेत. त्यांनी अनेक आयटी कंपन्या तसेच अन्य कंपन्यांशी करार करून आपलीच वाहने लावली आहेत. त्यामुळे कॅबचालकांचा व्यवसाय कमी होण्याबरोबरच कंपनीकडून गाड्या बंद केल्या जात असल्याने कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व कॅबचालक संप करणार आहेत.
ओला, उबेरने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला १.२५ लाख रुपये व्यवसायाची हमी द्यावी, कारच्या श्रेणीनुसार भाडे देण्यात यावे, कमी दराची बुकींग बंद करावी, ओला, उबेरने स्वत:कडील गाड्या बंद कराव्यात, काळ्या यादीत टाकलेल्या गाड्या व वाहन चालकांचा व्यवसाय पुन्हा सुरू करावा अादी मागन्या चालकांनी केल्या अाहेत.