कोबीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने शेतात सोडल्या शेळ्या-मेंढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:26+5:302021-04-19T04:10:26+5:30
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पहिल्यांदाच कोबी केला होता. अर्ध्या एकराला चाळीस हजारांच्या आसपास खर्च आला होता. ...
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पहिल्यांदाच कोबी केला होता. अर्ध्या एकराला चाळीस हजारांच्या आसपास खर्च आला होता. आता एक किलो वजनाच्या पुढे कोबीचे गड्डे झाले होते. हा लग्नसराईचा हंगाम असतो. तसेच मुस्लिम धर्मीयांचे रोजे सुरु आहेत. या काळात कोबीला मोठी मागणी असते. काही वेळा व्यापारी शेतात येऊन शेतातील पीक उक्ते विकत घेतात. अशा वेळी शेतकऱ्यांना फायदा होतो. आता असे व्यपारी ग्रामीण भागात फिरकतच नाहीत. त्यामुळे शेतमाल बाजारपेठेत नेल्यावर कोबीला कवडीमोल भाव आल्यास तो तेथेच सोडून द्यावा लागतो. परिणामी तोडणी, कापणी, वाहतुकीचा खर्चही निघत नाही. शेतकऱ्याला मोकळ्या हताने घरी यावे लागते.
या वर्षी पुरंदरच्या दुष्काळी भाग असलेल्या गुळुंचे, कर्नलवाडी, राख व वाल्हे गावच्या पूर्व पट्ट्यात पावसाने उच्चांकी गाठली होती. त्यामुळे ओढेनाले दिवाळीपर्यंत तुडुंब भरले होते. विहिरीही भरल्या आहेत. मुबलक पाणी असल्याने पुरंदरच्या दक्षिण पूर्व पट्ट्यातील शेतकरी या वर्षी पहिल्यांदाच भाजीपाला पिकाकडे (तरकारी) वळाले आहेत. या वर्षी पहिल्यांदाच कोथिंबीर, कारले, टोमॅटो, भेंडी, गवार, मेथी, मिरची ही पिके आता जोमात आहेत.
"शहरी भागात चायनीज पदार्थ करणाऱ्यांना कोबीचे गड्डे खूप गरजेचे असतात. हे व्यावसायिक अन्नपदार्थात मोठ्या प्रमाणावर कोबी वापरतात. सध्या लॉकडाऊनमुळे चायनीजचे गाडे बंद आहेत. त्यामुळे कोबीची मागणी घटली आहे. कोबी तोडून बाजारात नेणेही परवडत नाही, त्यामुळे शेळ्या-मेंढ्या घालून शेत मोकळे करावे लागत आहे. पुढील हंगामाची तयारी आता करावी लागेल." शेतकरी : दत्तात्रय निगडे, गुळुंचे.
कोबीच्या गड्ड्याला बाजारपेठेत कवडीमोल भाव आल्याने कोबीच्या शेतात शेतकऱ्याने शेळ्या-मेंढ्या सोडल्या. (छाया : भरत निगडे, नीरा)