बावधन खुर्द येथील वन्यजीव उपचार व अनाथालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 02:00 PM2018-10-25T14:00:01+5:302018-10-25T14:05:51+5:30
मानवी हल्ल्यामुळे किंवा वाहनांची धडक बसल्यामुळे जखमी झालेल्या वन्य जीवांवर उपचार करण्यासाठी पुण्यात स्वतंत्र केंद्र सुरू होणार आहे.
पुणे : बावधान खुर्द येथे वन्य जीवांसाठी उपचार केंद्र व अनाथालय उभारण्याच्या वन विभागाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजूरी दिली. त्यामुळे मानवी हल्ल्यामुळे किंवा वाहनांची धडक बसल्यामुळे जखमी झालेल्या वन्य जीवांवर उपचार करण्यासाठी पुण्यात स्वतंत्र केंद्र सुरू होणार आहे. परिणामी पुढील काळात वन विभागाला वन्यजीव उपचारासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या उपचार केंद्रावर अवलंबून राहावे लागणार नाही.
जिल्ह्यात भीमाशंकर सारखे मोठे अभयारण्य असून शेकरू, बिबट्या, वानर, माकड, कोल्हा, लांडगा, हरिण, काळवीट आदी वन्य प्राणी आढळून येतात. तसेच शहरात व इतर परिसरात विविध वन्य पक्षीही आढळून येतात. दिवसेंदिवस वन क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे काही कारणास्तव हे वन्य प्राणी जखमी होतात. तसेच आजारी पडतात. त्यामुळे त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून या ठिकाणी जखमी वन्य प्राणी उपचारासाठी आणले जातात. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यात माणिकडोह येथे बिबट्या निवारण केंद्र आहे. याठिकाणी जखमी बिबट्यावर उपचार केले जातात. त्याचप्रमाणे त्यांचे संगोपनही केले जाते.
प्राणी संग्रहालयातील वन्य पक्षी व प्राण्याची संख्या आणि त्यांच्यावर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संग्रहालयात वन विभागाकडून जखमी वन्य प्राणी उपचारासाठी दाखल केले जातात. मात्र, वन विभागाने स्वत:चे वन्यजीव अनाथालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून वज्यजीव उपचार केंद्र स्थापन करण्याचा शासनाकडे पडून होता. अखेर मंत्रिमंडळाकडून त्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे उशीराका होईना बावधान परिसरात नवीन वन्यजीव उपचार केंद्र सुरू होणार आहे.