फुकटात कॅडबरी दिली नाही; मेडिकल शॉपची कोयत्याने तोडफोड, पोलिसांनी भाईंची काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 02:12 PM2023-07-19T14:12:11+5:302023-07-19T14:18:52+5:30
पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपींचा शोध घेऊन धिंडही काढली
किरण शिंदे
पुणे : कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या स्वयंघोषित भाईंविरोधात पुणेपोलिसांनी मोहीम उघडली आहे. दहशत माजवणाऱ्या स्वयंघोषित भाईंना पोलीस आता त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहेत. याचाच प्रत्यय मुंढवा परिसरात पुन्हा एकदा आलाय. फुकटात कॅडबरी दिली नाही म्हणून मेडिकल शॉपची कोयत्याने तोडफोड करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. ज्या भागात या दोघांनी कोयता काढून गोंधळ घातला त्याच भागात या दोघांची पोलिसांनी धिंड काढली.
रामेश्वर सावंत आणि अभिषेक संजय जरांडे अशी या दोघांची नावे आहेत. 16 जुलै रोजी या दोघांनी मुंढवा परिसरातील एका मेडिकल शॉपमध्ये जाऊन काही चॉकलेट घेतले. दुकानदाराने या दोघांना चॉकलेटचे पैसे मागितले असता त्यांनी तू पैसे मागितलेच कसे, आम्ही कोण आहोत हे तुला माहीत नाही का असे विचारत हुज्जत घातली. इतकच नाही तर आरोपींनी लपवून ठेवलेला कोयता काढत मेडिकल दुकानाची तोडफोड केली. यात मेडिकलचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान प्रकरण पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी अवघ्या बारा तासात या दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशत मोजण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या दोघांची वरात देखील काढली.
पुणे शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता घेऊन दहशत वाजवणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या या जलद कारवाईचं नागरिकांकडून देखील कौतुक केलं जात आहे.