‘केडन्स’चा डेक्कन जिमखानावर एका धावेने थरारक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:21 AM2021-02-05T05:21:57+5:302021-02-05T05:21:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पाथ-वे फाउंडेशनच्या वतीने आयोजित एम ३ करंडक आंतर क्लब २३ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पाथ-वे फाउंडेशनच्या वतीने आयोजित एम ३ करंडक आंतर क्लब २३ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या सुपरलीग फेरीत शुभम हरपाळे (नाबाद २५ धावा व ३-४३) याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखाना संघावर केवळ एका धावेने थरारक विजय मिळविला.
अन्य लढतीत शुभम मेड (५-३२) याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने अँबिशियस क्रिकेट अकादमी संघावर ७ गडी राखून सहज विजय मिळविला.
डेक्कन जिमखाना व नेहरू स्टेडियम क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केडन्स क्रिकेट अकादमी संघ ४२.५ षटकात २१० धावांवर संपला. यात आर्शिन कुलकर्णीने ४१ चेंडूत ९ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४९ धावा व प्रद्युम्न चव्हाण (१५ धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५२ चेंडूत ६२ धावाची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर शेवटच्या जोडीने शुभम हरपाळे (नाबाद २५) व यतीन मंगवाणी (१४ धावा) यांनी दहाव्या गड्यासाठी ४८ चेंडूत ४० धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून संघाला २१० धावांचे आव्हान उभे करून दिले. डेक्कन जिमखानाकडून यश बोरामनी (४-२३), रोहन फंड (२-२८), धीरज फटांगरे (२-३७), आत्मन पोरे (१-४३), यश शितोळे (१-२८) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघ ४३.५ षटकात २०९ धावावर कोसळला. यात स्वप्निल फुलपगार (६८ धावा) व यश बोरामणी (३० धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६० चेंडूत ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर निकुंज बोरा ३०, अभिषेक ताटे २३, अजय बोरुडे १३, रोहन फंड १२, आत्मन पोरे १२ यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. डेक्कन संघ ४३ षटकात ९ बाद २०९ धावा असा असताना शेवटच्या १२ चेंडूत विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती. पण शुभम हरपाळे (३-४३) ने रिषभ शर्माला बाद करून संघाला १ धावेने विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात शुभम मेड (५-३२) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने अँबिशियस क्रिकेट अकादमीवर ७ गडी राखून विजय मिळविला. मैदान ओले असल्यामुळे हा सामना प्रत्येकी ३६ षटकांचा खेळविण्यात आला. पहिल्यांदा खेळताना सिद्धांत दोशी (४७), प्रथमेश पाटील (नाबाद २२), तनिश जैन (१३) यांच्या जोरावर ‘अँबिशियस’ने ३६ षटकात ७ बाद १३९ धावा केल्या. क्लब ऑफ महाराष्ट्र कडून शुभम मेडने ३२ धावात ५ गडी बाद करून संघाच्या विजयाचा पाया रचला. हे आव्हान क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने २९.१ षटकात ३ बाद १४५ धावा करून पूर्ण केले. यात राजवर्धन उंडरे (नाबाद ५६), शिवकुमार चुग (३४) यांची कामगिरी महत्वाची ठरली. सामनावीर शुभम मेड ठरला.