अवसरी बुद्रूक गावात वनविभागाने लावला पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:09+5:302021-06-20T04:08:09+5:30
अवसरी बुद्रूक गावच्या दक्षिणेला संपूर्ण डोंगर रांग असून, याच परिसरातून डिंभे धरणाचा उजवा कालवा जात आहे. यामुळे संपूर्ण शेती ...
अवसरी बुद्रूक गावच्या दक्षिणेला संपूर्ण डोंगर रांग असून, याच परिसरातून डिंभे धरणाचा उजवा कालवा जात आहे. यामुळे संपूर्ण शेती ही बागायती झाली आहे. परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून मागील आठ ते दहा वर्षांपासून बिबट्याने उसाला आपला रहिवास मानला आहे. ऊसक्षेत्रात आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबटे आढळत आहे. मागील तीन वर्षांपूर्वी याच परिसरात पाच बिबट्यांच्या पिल्लांचा होळपळून मृत्यू झाला होता, तर अनेक वेळा बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. तीन ते चार दिवसांपूर्वी दोन बिबट्यांचे दर्शन ग्रामस्थांना झाले होते. शेतकऱ्यांच्या तत्परतेने तेथील पोल्ट्रीमधील बिबट्यांच्या हल्ल्यापासून कोंबड्यांना वाचवण्यात यश आले होते.
दोन बिबट्यांचे दर्शन हे मोबाईलमध्ये कैद ही बातमी प्रसिद्ध केली होती. अनेक वेळा मागणी करूनही पिंजरा बसविण्याचे काम वनखाते करत नव्हते. वनखात्याच्या अवसरी बुद्रूक येथील वनपाल शीतल शिंदे यांनी याठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा बसविला असून, दररोज सकाळ-संध्याकाळ त्याची पाहणी करत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यामध्ये भक्ष्यक ठेवण्यात आले आहे.
- अवसरी बुद्रूक येथील वरचा हिंगे मळा येथे बिबट्याचा वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे वृत्तपत्रांची दखल घेऊन वनविभागाने तत्काळ पिंजरा बसवला आहे.