‘आई’च्या हंबरड्यामुळे जबड्यातून वासरू सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:31 AM2017-08-18T01:31:28+5:302017-08-18T01:31:31+5:30
गाय-वासरावर बिबट्याने हल्ला करत वासराला जबड्यात धरून उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला
शेलपिंपळगाव : गाय-वासरावर बिबट्याने हल्ला करत वासराला जबड्यात धरून उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र गायीच्या हंबरड्याने वासराचे प्राण वाचले. ही घटना गुरुवारी (दि.१७) पहाटे शिरूर तालुक्यातील वाजेवाडीच्या मलघेवस्ती येथे घडली.
खेडच्या पूर्व तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आता दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असून हल्लेही वाढले आहेत. येथील भाऊसाहेब मलघे यांच्या गोठ्यात गुरुवारी पहाटे बिबट्याने हा हल्ला केला. गायीचा जोरजोरात हंबरड्याचा आवाज येत होता. मलघे यांनी घराची खिडकी उघडून गोठ्याकडे पाहिले तर अंगावर ठिपके असलेला मोठा प्राणी वासराला घेऊन चालला होता. गायही त्याला प्रतिकार करत होती. ही घटना पाहून आम्ही प्रचंड घाबरलो. आरडाओरडा केला. यामुळे बिबट्याने त्या वासराला सोडून पळ काढला. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाºयांनी पाहणी केली.
तीन-चार दिवसांपूर्वी वाजेवाडी परिसरात तेजस्वी वाजे तर साबळेमळा येथेही नागरिकांनी बिबट्या पाहिला होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तत्काळ दोन-तीन ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी सरपंच योगिता वाजे, कचरू वाजे, धर्मराज वाजे, सुरेश भोसले, अनिल वाजे, भिवाजी मलघे, दत्तात्रय साबळे, सर्जेराव वाजे आदींसह ग्रामस्थांकडून केली जात आहे.
>वारंवार होतेय बिबट्याचे दर्शन
या परिसरात ऊस व मक्याचे मोठे क्षेत्र आहे. खेडच्या पूर्व भागातील कोयाळी भानोबाची, मरकळ, मोहीतेवाडी, चºहोली खुर्द गावात बिबट्याचा वावर असल्याचे अनेकवेळा निदर्शनात आले आहे. मागील आठवड्यात कोयाळीत बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला होता. त्यानंतर वनविभाग कर्मचाºयांना त्याचे ठसेही मिळाले होते. चौफुला, मांजरेवाडी, साबळेवाडी, वाजेवाडी गावच्या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे.
>बिबट्याला पाहून दुचाकीस्वार घसरल्याने जखमी
पिंपळवंडी : येडगाव (ता. जुन्नर) येथील शेतकरी बाळासाहेब मुरलीधर भोर हे मोटासायकलवरून घरी जात असताना अचानक समोर बिबट्या दिसला. घाबरून ते मोटारसायकलवरून खाली पडले व जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. भोर हे कामानिमित्त चौदा नंबर येथे गेले होते. ते काम उरकून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना मोकसबागेकडे जाणाºया फाट्याजवळ त्यांना अचानक समोर बिबट्या दिसला. तो त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत
होता. ते गडबडून गेले आणि त्यातच त्यांची मोटारसायकल घसरून ते खाली पडले. आरडाओरडा केला, त्या आवाजाने बिबट्याने धूम ठोकली. भोर यांच्या हाताला-पायाला व तोंडाला मार लागला आहे. ते जखमी अवस्थेत पुन्हा मोटारसायकलवरून घरी गेले व नागरिकांना घाबरतच झालेला प्रकार सांगितला. येथील खानेवाडी परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात उपद्रव आहे. दिवासाही शेतात काम करणे अवघड झाले आहे.
बिबट्याच्या भीतीने मिळेना शेतमजूर : शेतात काम करत असताना अचानक कधी बिबट्या समोर येईल, याचा भरवसा नाही. या भीतीमुळे शेतमजूरही मिळत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसे निवेदन वनखात्याला देण्यात आले असल्याची माहिती जखमी शेतकरी बाळासाहेब भोर यांनी दिली.