मदतीसाठी कस्टमर केअरला फोन केला अन् २ लाख गमावले
By भाग्यश्री गिलडा | Published: August 4, 2023 12:50 PM2023-08-04T12:50:11+5:302023-08-04T12:50:31+5:30
अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पुणे : काही तांत्रिक अडचणी आल्याने गुगलवरून कस्टमर केयरचा नंबर मिळवत त्यावर फोन केला असता फसवणूक झाल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. ०२) पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
यासंदर्भात एका तरुणीने (वय २६, रा. सिंहगड रोड) पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार तरुणी त्यांच्या कम्प्युटरवर काम करत होते. त्यावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांनी गुगलवरून कस्टमर केयरचा नंबर मिळवला. त्या नंबरवर फोन केला असता कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे भासवून शंका निरसन करण्यासाठी दहा रुपये चार्ज लागेल असे सांगितले. तक्रारदार तरुणीने सहमती दर्शवल्यावर विश्वास संपादन करून ओटीपी घेऊन ५ हजार रुपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाईल नंबर अकाउंटला लिंक केला आणि खासगी माहितीचा वापर करून एकूण १ लाख ९५ हजार रुपये तरुणीच्या खात्यातून परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.