Kidnapping: जमीन खरेदीचे पैसे देण्याच्या नावाने बोलावले; अपहरण करून उत्तर प्रदेशात नेले, मागितले १० लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 04:07 PM2022-03-27T16:07:34+5:302022-03-27T16:07:54+5:30
सुखरुप सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर
पुणे : जागा खरेदीसाठी अगाऊ पैसे देऊन उरलेले पैसे देण्यासाठी केसनंदला बोलावून घेतले. तेथून अपहरण करुन उत्तर प्रदेशात नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या सुखरुप सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरीफ ऊर्फ कोंडिबा दगडे (वय ५५, रा. बिवरीगाव, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बिवरी गावातील एका ५५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा गणेश कोडिंबा दगडे (वय ३९) याचा शेती तसेच प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. केसनंद येथील त्यांच्या प्लॉटिंगच्या जागेमध्ये आरीफ खान याने जागा खरेदी केली. त्यासाठी त्याने काही रक्कम आगाऊ दिली. उरलेली रक्कम देण्याच्या बहाण्याने त्याने गणेश दगडे यांना २४ मार्च रोजी दुपारी केसनंद येथे बोलावून घेतले. गणेश दगडे हे दुपारी दीड वाजता तेथे गेले असताना त्यांनी दगडे यांना जबरदस्तीने आपल्या मुळ गावी उत्तर प्रदेशात पळवून नेले. तेथे त्यांना डांबून ठेवले आहे. त्यांना सुखरुप सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. हे समजताच त्यांच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, आरोपीने उत्तर प्रदेशात पळवून नेल्याचे दिसून येत असून तपास पथके रवाना करण्यात आले आहे.