बाप्पांच्या डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायला आलो अन् इथंच अडकलो; एसटी संपाचा प्रवाशांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:54 PM2024-09-04T15:54:01+5:302024-09-04T15:54:43+5:30
एसटी संपाच्या संधीचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी दामदुप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूट करण्यास सुरुवात केली आहे
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारल्याने त्याचा मोठा फटका पुणे विभागातील प्रवाशांना बसला. संपाच्या पहिल्याच दिवशी स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) आणि पुणे स्टेशन बसस्थानकातून नियमितपणे सुटणाऱ्या गाड्यांपैकी निम्म्यांपेक्षाही कमी गाड्या रस्त्यावर उतरल्या. परिणामी शहरातील बसस्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. बाहेरगावी निघालेल्या प्रवाशांना तास न् तास बसची वाट पाहावी लागली. याच संधीचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी दामदुप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली.
एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक अनेक वर्षांपासून रखडली आहे. सातत्याने आंदोलने करूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचे हत्यार उपसले. या संपामध्ये राज्यातील जवळपास ११पेक्षा अधिक संघटनांनी सहभाग नोंदवला आहे. कर्मचारी व संघटनांनी एकत्र येत पुणे विभागातील सर्वच एसटी स्थानकात धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी दुप्पट भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू असल्याचे चित्र शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) व पुणे स्टेशन या एसटी बस स्थानकांवर पाहायला मिळत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन मिळावे.
- कामगार कराराच्या तरतुदीनुसार २०१८ ते २०२४ पर्यंत वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी.
- एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीची घरभाडे भत्त्याची थकबाकी देण्यात यावी.
- एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी देण्यात यावी.
- सेवाज्येष्ठतेनुसार कामगारांच्या मूळ वेतनात झालेली विसंगती दूर करून सर्वच कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये वाढ करावी.
- एसटीचे खासगीकरण बंद करावे.
- सुधारित जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा.
- इनडोअर व आऊटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा.
- जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बसेस खरेदी करा.
- चालक, वाहक, कार्यशाळा व महिला कर्मचाऱ्यांना अद्ययावत व सर्व सुखसोयींचे विश्रांतीगृह द्या
- वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.
- विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना बसचा वर्षभराचा मोफत पास द्यावा.
एसटी धरणे आंदोलनाचा प्रवाशांना आर्थिक फटका; संपामुळे खासगी ट्रॅव्हल्सने केलेली दरवाढ
गाव एसटी दर खासगी ट्रॅव्हल्स दर
मुंबई ३७० ५०० ते ७००
कोल्हापूर ३६५ ६५०
सांगली ३५० ६००
पंढरपूर ३६५ ७००
लातूर ५९० ८००
छ. संभाजीनगर ३२० ७००
नागपूर १,६०० २,००० ते २,५००
ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय
पुण्यात बाहेर गावावरून गणेश उत्सवासाठी खरेदीसाठी, तसेच उत्सवासाठी अनेक जण येतात. त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात संपामुळे सरकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. चाकरमान्यांचे हाल झाल्याने प्रवाशांना घाम फुटला.
कृती समितीसोबत ७ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. त्यात एकमत झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० ऑगस्टला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आज ३ सप्टेंबर उजाडला, तरी अद्याप बैठक घेतली नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढला आहे. तोडगा न निघाल्याने धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. राज्यातील ७० टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. गणेशोत्सवाचा काळ असल्याने गणेशभक्तांची गैरसोय होत आहे, परंतु त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. - संदीप शिंदे, महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती.
पुणे विभागातील १४ आगारांतून ८५० बस रोज धावत आहेत. रोजचे दीड कोटीचे उत्पन्न असून, एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनामुळे बुधवारी पुणे जिल्ह्यातील आगारामध्ये प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले, तसेच उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. या संपामुळे उत्पन्नात घट झाली असून, ७० लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. मात्र, प्रवाशांसाठी भाडेतत्त्वावरील बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे. - प्रमोद नेहुल, पुणे विभाग नियंत्रक.
पुण्याला गणेशोत्सवासाठी डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी आलो होतो. मात्र, सकाळपासून वाकडेवाडी येेथे लातूरला जाण्यासाठी बस मिळत नसल्याने येथे अडकलो आहे. जाण्यासाठी खासगी वाहने दुपटीने जादा भाडे सांगत आहेत. - ओकार कांबळे, लातूर.