हिवताप नियंत्रणासाठी मोहीम
By admin | Published: June 2, 2016 12:52 AM2016-06-02T00:52:53+5:302016-06-02T00:52:53+5:30
राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमांतर्गत राज्यभरात हिवतापाच्या प्रतिबंधासाठी जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जाणार आहे.
पुणे : राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमांतर्गत राज्यभरात हिवतापाच्या प्रतिबंधासाठी जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जून महिना हा दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा करत हिवतापाबाबत जनजागृती केली जाते. या आजाराची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि या आजाराला कारणीभूत असणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रविवार सोडून सर्व दिवस म्हणजेच एक दिवस एक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्यातील हिवतापाच्या रुग्णांची संख्या मागील वर्षीपेक्षा कमी झाली असून, येत्या काळात ही संख्या आणखीन कमी करायची असल्याचेही डॉ. जगताप यांनी सांगितले.
यामध्ये दरहजारी लोकसंख्येमागे दरवर्षी किती हिवतापाचे रुग्ण आहेत, यानुसार त्या जिल्ह्याची नोंद केली जाते. या परिमाणानुसार राज्यात वार्षिक रोगजंतू निर्देशांक ०.१ पेक्षा कमी कमी असणारे १६ जिल्हे असून, त्यात पुण्याचा समावेश आहे. हा निर्देशांक १ हून कमी असणारे १५ व निर्देशांक १ ते २ असणारे गोंदिया व चंद्रपूर हे २ जिल्हे आहेत. हा रोगजंतू निर्देशांक १० पेक्षा जास्त असणारा गडचिरोली हा एकमेव जिल्हा आहे.
२०२५ पर्यंत राज्यातून हिवताप हा आजार हद्दपार व्हावा, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार विशेष प्रयत्न चालू असल्याचे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)