वेताळ टेकडी बचावसाठी पुणेकरांची मोहीम; १५ एप्रिलला काढली जाणार रॅली
By श्रीकिशन काळे | Published: April 5, 2023 06:57 PM2023-04-05T18:57:14+5:302023-04-05T18:58:27+5:30
सोशल मीडियावर याचा फोटो, टॅग, व्हाॅटसअप स्टेटस ठेवले जात आहेत...
पुणे : वेताळ टेकडी वाचविण्यासाठी आता पुणेकरांनी 'सेव्ह वेताळ टेकडी' अशी मोहिम सुरू केली आहे. सोशल मीडियावर याचा फोटो, टॅग, व्हाॅटसअप स्टेटस ठेवले जात आहे. महापालिकेच्या विरोधात ही मोहिम आहे.
बालभारती-पौड रस्ता वेताळ टेकडीवरून प्रस्तावित आहे. त्याने टेकडीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे विरोध होत आहे. परंतु महापालिका त्याला न जुमानता प्रस्ताव रेटत आहे.
येत्या १५ एप्रिल रोजी वेताळ टेकडीवर वेताळबाबा मंदिरासमोर पुणेकर एकत्र येऊन रॅली काढणार आहेत. त्यात नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे म्हणून आवाहन करण्यात आले आहे. एकदा टेकडीचे नुकसान झाले तर पुन्हा तिचे वैभव परत मिळणार नाही. त्यामुळे प्रस्तावित रस्ता होऊच नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे.
शनिवारी चर्चासत्राचे आयोजन...
वेताळ टेकडी बचाव कृती समिती आणि लोकायतच्या वतीने ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिक्षक भवन, नवी पेठ येथे चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये डॉ. सुषमा दाते (समन्वयक, वेताळ टेकडी बचाव कृती समिती) व प्रदीप घुमारे (कन्सल्टिंग इंजिनियर), रूषल हिना (सामाजिक कार्यकर्ते, लोकायत) यांचा सहभाग असणार आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवर बालभारती ते पौड फाटा रस्ता आणि दोन बोगद्यांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. खरंच यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे का? या प्रकल्पांचे आपल्यावर आणि पर्यावरणावर काही परिणाम होणार आहे का? याला इतर कोणताही उपाय आहे की नाही? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे यावेळी मिळणार आहेत.