बारामती तालुक्यात छावण्यांचे नियोजन
By Admin | Published: April 1, 2016 03:30 AM2016-04-01T03:30:48+5:302016-04-01T03:30:48+5:30
तालुक्यातील ६१ हजारांहून अधिक लोकसंख्येला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरची संख्या ३० वर पोहोचली आहे. १९ गावे व २०३ वाड्यावस्त्यांना टँकरच्या
बारामती : तालुक्यातील ६१ हजारांहून अधिक लोकसंख्येला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरची संख्या ३० वर पोहोचली आहे. १९ गावे व २०३ वाड्यावस्त्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असताना जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे तालुक्यात जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
दुष्काळी भागातील सव्वा लाखाहून अधिक लहान-मोठ्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गळीत हंगाम संपल्यामुळे उसाचे वाढेदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. याचअनुषंगाने चारा छावण्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सहकारी संस्थांमार्फत चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी छावण्यांमध्ये किती शेतकरी जनावरे सोडणार, याची माहिती गावपातळीवर घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.
तालुक्यात ३० टँकरद्वारे दररोज ९१ पाण्याच्या खेपा केल्या जातात, असे पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी सांगितले. आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी तहसीलदारांकडे तत्काळ प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. तालुक्यातील बाबुर्डी, कारखेरेवाडी, जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, पानसरेवाडी, कारखेर, जराडवाडी या गावांमध्ये वर्षभरापासून टँकर सुरू आहेत.
त्याचबरोबर, या वर्षी खराडेवाडी, उंडवडी सुपे, कोळोली, उंडवडी कडेपठार, वाकी, मोराळवाडी, कुतवळवाडी, दंडवाडी, साबळेवाडी, निंबोडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजूबावी, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, सायंबाचीवाडी, भिलारवाडी, तरडोली, मासाळवाडी, वढाणे, लोणी भापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुढाळे गावांसह अन्य २०३ वाड्यावस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. आणखी टँकरचे प्रस्ताव असताना त्या ठिकाणी कायम पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठीदेखील जलयुक्त शिवार योजना, चाऱ्या-नाले खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत. यंदा समाधानकारक पाऊस पडल्यास या कामांचा फायदा पावसाचे पाणी अडविण्यास होईल.(प्रतिनिधी)
पाणीसाठा : प्लॅस्टिक टाक्यांची गरज
1गावोगावी, वाड्यावस्त्यांत टँकरने पाणीपुरवठा करताना विलंब होत आहे. नागरिक टँकरचे थेट पाणी भरण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे टँकर थांबून राहतो. मोठ्या गावांमध्ये अडचण येत नाही; मात्र वाड्यावस्त्यांतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येतात. त्यामुळे १ हजार ते ५ हजार लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या टाक्या दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, राजकीय कार्यकर्त्यांकडून मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. टाक्यांमध्ये पाणी साठविल्यास तेथून नागरिक पाणी घेऊन जातील. त्यामुळे टँकरच्या खेपादेखील वाढतील, असे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले.
यापूर्वी चारा डेपोसाठी जनावरांची संख्या मोजण्यात आली होती. आता जनावरांच्या छावण्यांसाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे जनावरांची संख्यादेखील वाढेल.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरमार्फत सोडविला जात असताना जनावरांच्या पाण्यासाठीदेखील नियोजन करावे लागत आहे. त्याचबरोबर, चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.
त्यानुसार नियोजन केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. पाण्याच्या टँकरचे आलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्यासाठी पाठविण्यात येत आहेत.