तरुणाईने खडकवासला परिसर फुलला

By Admin | Published: July 17, 2017 04:16 AM2017-07-17T04:16:55+5:302017-07-17T04:16:55+5:30

धुक्यात हरवलेल्या सिंहगडाचे लोभस दृश्य आणि गडावरून दिसणारे सह्याद्रीचे पावसात चिंब झालेली हिरवीगार शेतं...

The campus blossomed in the Khadakwasla | तरुणाईने खडकवासला परिसर फुलला

तरुणाईने खडकवासला परिसर फुलला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खडकवासला : धुक्यात हरवलेल्या सिंहगडाचे लोभस दृश्य आणि गडावरून दिसणारे सह्याद्रीचे पावसात चिंब झालेली हिरवीगार शेतं... अशा आल्हाददायी वातावरणात पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटला. वनविभाग आणि ग्रामीण पोलिसांच्या समन्वयामुळे पर्यटकांच्या आनंदात कोठेही व्यत्यय आला नाही.
सिंहगड, पानशेत, खडकवासला परिसरात पडत असलेल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटकांनी रविवारी या परिसरात गर्दी केली होती़ संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यावर शुक्रवारी रात्री कोसळलेल्या दरडीचा मलबा वनसंरक्षक समितीच्या सुरक्षारक्षकांनी बाजूला केल्याचे वनाधिकारी हेमंत मोरे यांनी सांगितले. पर्यटकांनी केलेल्या गर्दीमुळे गोळेवाडी टोलनाक्यावर टप्प्याटप्प्याने वाहतूक थांबवण्यात आली. तसेच दरड कोसळू शकणाऱ्या काही संभाव्य ठिकाणी सुरक्षारक्षक लक्ष ठेवून होते़ असे असतानाही रविवारी मोठ्या संख्येने दुचाकी व चारचाकीतून पर्यटक गडावर आले होते़ त्यामुळे गडावरील पार्किंग फुल्ल झाले होते़
रविवारीच्या सुट्टीची संधी साधून पर्यटकांची सकाळपासूनच खडकवासला, पानशेत, सिंहगडावर गर्दी होण्यास सुरुवात झाली होती़ खडकवासला धरणाजवळील चौपाटी तरुणतरुणींनी फुलून गेली होती़ पावसात भिजत भजी आणि भुट्टे खाण्याचा आनंद लुटण्यात सर्व मग्न होते़ खडकवासला येथील धरणाच्या पाण्याजवळ थांबून अनेक जण पुढे पानशेत, वरसगाव धरणाकडे जाताना दिसत होते़ त्यामुळे खडकवासला डोणजे रस्त्यावर चौपाटीजवळ अनेकदा वाहतुकीची कोंडी होताना दिसत होती़ पोलीस व ग्रामस्थ या वाहनांना रस्ता करून देत होते़ खडकवासला धरणाच्या पाण्यात कोणीही उतरू नये, यासाठी परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता़ त्यात २ पोलीस उपनिरीक्षक, ३० पोलीस कर्मचारी आणि बाँब शोधपथक यांचा समावेश होता. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विश्वंभर गोल्डे यांनी नियोजन केले.

Web Title: The campus blossomed in the Khadakwasla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.