कॅम्पस क्लब : ध्येयासक्त ग्रंथालयशास्त्रज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:02+5:302021-08-13T04:14:02+5:30
भारतात ग्रंथालये अस्तित्वात असली तरी ती राजे, संस्थानिक व धर्ममार्तंडाच्या ताब्यात होती. सर्वसामान्यांपर्यंत तिचा प्रसार नव्हता. याची गरज आहे, ...
भारतात ग्रंथालये अस्तित्वात असली तरी ती राजे, संस्थानिक व धर्ममार्तंडाच्या ताब्यात होती. सर्वसामान्यांपर्यंत तिचा प्रसार नव्हता. याची गरज आहे, हे सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांनी जाणले आणि आपले आयुष्य भारतात ग्रंथालय चळवळ उभी करण्यातच व्यतीत केले.
गणित विषयाचे अध्यापक असलेले रंगनाथन वृत्तीने अभ्यासू व चिकित्सक होते. त्यामुळेच तत्कालीन मद्रास विद्यापीठाने आपल्या ग्रंथालयाच्या पहिल्या ग्रंथपालपदी त्यांची नियुक्ती केली. ग्रंथपालन प्रशिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले व 'स्कूल ऑफ लायब्रेरिअनशिप'मधील अभ्यासक्रम पूर्ण केला. क्रॉयडन येथील सार्वजनिक ग्रंथालयात पडेल ते काम करून ग्रंथालयांच्या कार्यपद्धती तुलनात्मक रितीने अभ्यासल्या. निरनिराळ्या ग्रंथवर्गीकरणांचा सखोल अभ्यास केल्यामुळे भारतात परतताना बोटीवरच त्यांनी आपल्या नियोजित 'द्विबिंदू वर्गीकरण' पद्धतीचा आराखडा प्रसिद्ध केला. एका भारतीय व्यक्तीने निर्माण केलेल्या ग्रंथालयशास्त्रातील पहिल्या वर्गीकरण पद्धतीचा तो उदय होता. त्यांनी १९३१ मध्ये लिहिलेला ग्रंथालयशास्त्राच्या मूलतत्त्वांचा विचार करणारा 'द फाइव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स' हा ग्रंथ जगभरातील संपूर्ण ग्रंथालय विश्वालाच मार्गदर्शक ठरला. ग्रंथालय क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम करून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणाऱ्या या ध्येयासक्त भारतीय ग्रंथालयशास्त्र जनकाने देशात वाचनसंस्कृती सक्रिय केली.
- प्रसाद भडसावळे