यंदा रेनकोट मिळतील का...?
By admin | Published: July 25, 2016 02:32 AM2016-07-25T02:32:23+5:302016-07-25T02:32:23+5:30
स्वेटर थंडीत हवेत; पण मिळतात उन्हाळ्यात...शालेय साहित्य शाळा सुरू होण्यापूर्वी हवे, पण मिळते दिवाळीच्या सुटीत... सायकली शाळेत जाण्यासाठी हव्यात;
सुनील राऊत, पुणे
स्वेटर थंडीत हवेत; पण मिळतात उन्हाळ्यात...शालेय साहित्य शाळा सुरू होण्यापूर्वी हवे, पण मिळते दिवाळीच्या सुटीत... सायकली शाळेत जाण्यासाठी हव्यात; पण मिळतात परीक्षा संपल्यावर. हा महापालिकेच्या शिक्षणमंडळाचा अजब कारभार पुणेकरांना नवीन नाही. या कारभाराची मालिका पावसाळ्यातील रेनकोटबाबतही सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
शिक्षण मंडळाकडून मे महिन्यापासून रेनकोट खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात असली, तरी पावसाळ्याचे दोन महिने संपल्यानंतरही ही खरेदी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या वर्षी पावसाळा संपल्यानंतरच मुलांना रेनकोट मिळणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तब्बल २ कोटी रुपयांची ही रेनकोट खरेदी असून, त्यासाठी आत्तापर्यंत दोन वेळा निविदा मागविण्यात आल्या आहेत.
मुलांना दर वर्षी वेळ निघून गेल्यानंतर, साहित्य मिळत असल्याने शिक्षण मंडळावर टीका होते. त्यामुळे या वर्षी मे २०१६ पासूनच रेनकोट खरेदीची प्रक्रिया सुरू केली असल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात येत आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा निविदा मागविण्यात आल्याचे शिक्षण मंडळप्रमुख शुभांगी चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पहिल्यांदा ५ निविदाधारक आले होते. त्यातील सर्वांत कमी दर असलेल्या तीन पात्र झालेल्या निविदाधारकांनी सादर केलेले रेनकोट तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असता, ते शिक्षण मंडळाच्या निकषात बसले नाहीत. त्यामुळे पुन्हा निविदा मागविल्या होत्या. यात ११ जणांनी निविदा भरल्या असून, त्यातील ६ जण पात्र ठरले आहेत.
मुलांची गैरसोय
गेल्या काही वर्षांत शिक्षण मंडळाच्या खरेदी प्रक्रियेत होत असलेल्या गोंधळामुळे; तसेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे मंडळ चांगलेच चर्चेत आले आहे; मात्र या गोंधळाचा फटका थेट एक लाख विद्यार्थ्यांना बसत आहे. शालेय साहित्य वेळेत न मिळणे, गणवेश वेळेत न मिळणे, स्वेटर उन्हाळ्यात मिळणे, पावसाळा संपल्यानंतर, रेनकोट मिळणे, शालेय स्पर्धासाठी मुलांकडून प्रवासशुल्क वसूल करणे याचा थेट फटका मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. एका बाजूला पुणे शहर स्मार्ट सिटी स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमांकावर आले असताना नागरिकांना जलद, प्रभावी आणि सक्षम सेवा देण्याची हमी देणाऱ्या महापालिकेस आपल्याच शाळांमधील मुलांना शालेय साहित्य वेळेत देता येत नसल्याने मुलांची
गैरसोय होत आहे.
रेनकोट खरेदी अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या निविदेत आलेले रेनकोट निकषात बसत नसल्याने; तसेच निकृष्ट दर्जाचे असल्याने फेर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार या वेळी रेनकोट तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच रेनकोट कधी देता येतील, हे सांगता येईल. अहवाल चांगला असल्यास पुढील आठ दिवसांच्या आत रेनकोट उपलब्ध करून दिले जातील.
- शुभांगी चव्हाण (शिक्षणप्रमुख)