... तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:41 PM2018-07-16T15:41:48+5:302018-07-16T16:00:46+5:30
प्रकाश आंबेडकर अधूनमधुन आरक्षणाविरोधात वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत आहेत : खासदार निलेश राणे
पुणे : मराठ्यांना आरक्षण मिळू नये किंवा त्याला विलंब लागावा म्हणून प्रकाश आंबेडकर प्रयत्न करत आहेत. अधूनमधुन आरक्षणाविरोधात वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांचा जर आरक्षणाला विरोध नसेल तर पाठिंबा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रात राहता येणार नाही, असा इशारा स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.
राणे यांनी पुण्यात सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना भारिप बहुजन महासंघाचे अध्य क्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी नारायण राणे यांच्यासह मराठा समाजातील अनेक नेते, कार्यकर्ते संघर्ष करत आहेत. तर आंबेडकरांकडून राणे समितीच्या अहवालावर चुकीची वक्तव्य केली जात आहेत.राज्य सरकार आणि आयोगाच्या पातळीवर आरक्षणाचा विषय असताना आंबेडकरांनी यामध्ये उडी का घेतली? आरक्षण हा आमचा हक्क आहे, भीक नाही. त्यांना आम्हाला शिकवू नये. त्यांना आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागेल, अन्यथा महाराष्ट्रात राहता येणार नाही. आरक्षण मिळू नये म्हणून सुरू असलेला त्यांचा प्रयत्न हाणून पाडला जाईल.
दुधदरवाढीवर बोलताना राणे म्हणाले, खासदार राजु शेट्टी अनेक आंदोलने करतात. दुध दरवाढीबाबत शेतकऱ्यांची मागणी न्याय असेल तर स्वाभिमान पक्ष शेतकऱ्यांच्या मागे उभा राहील. या मागणीबाबत सरकार दरबारी चर्चा व्हायला हवी. संभाजी भिडे यांच्याशी माझा कधीही संबंध आला नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या कोणत्याही वक्तव्याविषयी बोलणार नाही, असे सांगत राणे यांनी भिडे यांच्याविषयी बोलण्याचे टाळले. दरम्यान, कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाकडून पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.