सत्ता राबविता येत नाही का?, पालकमंत्र्यांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:17 AM2018-12-06T01:17:16+5:302018-12-06T01:17:28+5:30
१०० नगरसेवक असूनही तुम्हालाही सत्ता राबविता येत नाही का, असा संतप्त सवाल पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी सकाळी महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केला.
पुणे : जिल्हा नियोजनकडून ७ कोटी रुपये पालिकेला दिले, त्यातील एक पैसाही अद्याप खर्च झालेला नाही, अधिकारी तर काम करीतच नाहीत, पण १०० नगरसेवक असूनही तुम्हालाही सत्ता राबविता येत नाही का, असा संतप्त सवाल पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी सकाळी महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केला. प्रशासनाविषयीही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन मंडळाकडून महापालिकेला देण्यात आलेल्या निधीमधून करण्यात येत असलेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीसाठी म्हणून बापट सकाळीच महापालिकेत आले होते.
आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात त्यांनी बैठक घेतली. महापौर मुक्ता टिळक यांच्यासह आयुक्त राव, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भीमाले, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, महेश लडकत, सुनीता वाडेकर, आदित्य माळवे, अतिरिक्त आयुक्त, तसेच सर्व खात्यांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. बापट यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी कोणत्याही खात्याने त्यांच्याकडील निधीचा वापरच केला नसल्याचे लक्षात आल्यावर ते संतप्त झाले.
चांदणी चौक येथील भूसंपादन लवकर झाले नाही, यावरूनही बापट यांनी अधिकाऱ्यांना बरेच सुनावले. आयुक्त राव यांनी अधिकाºयांना कामाची नीट माहिती देण्यास सांगितले.
काही अधिकाºयांनी कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, कार्यारंभ आदेश दिला आहे असे सांगण्यास सुरुवात केली. मात्र आठ महिने झाले, तुमचे काम इतकेच झाले असेल तर तुम्हाला काम करायचे नाही, असाच अर्थ यातून निघतो असे सांगितले. पदाधिकाºयांना त्यांनी कामाचा नियमित आढावा घेण्याची सूचना केली. आठ महिने काही केले नाही आता ४ महिन्यांत तुम्ही काय करणार, असे ते म्हणाले.
>शंभर नगरसेवक असून उपयोग काय?
यापूर्वी जिल्हा नियोजनकडून पैसे मिळत नव्हते. मी ते आणले. तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी आठ महिन्यांपूर्वी दिला. कोणत्या खात्याने कोणती कामे करायची, हेही निश्चित झाले होते. पुलाच्या सुशोभीकरणासाठी विद्युतला ३ कोटी रुपये दिले. योग प्रचार व प्रशिक्षण यासाठी ३ लाख दिले. राम नदीसाठी २० लाख दिले. २० लाख रुपये शीतशवपेटीसाठी दिले. यातले कोणतेही काम
झालेले नाही. अधिकारी करतात काय, त्यांना काम करायचेच नसते,
मात्र १०० नगरसेवक असूनही तुम्हाला सत्ता राबवता येत नाही का, असा सवाल गिरीश बापट यांनी केला.