कालवा समितीची बैठक दिवाळीनंतर : आचारसंहितेचा अडसर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:29 AM2019-10-15T11:29:20+5:302019-10-15T11:30:03+5:30

 शेती आणि पिण्याच्या पाणी वाटपाचे नियोजन होणार

Canal Committee meeting after Diwali : Code of Conduct problem | कालवा समितीची बैठक दिवाळीनंतर : आचारसंहितेचा अडसर

कालवा समितीची बैठक दिवाळीनंतर : आचारसंहितेचा अडसर

Next
ठळक मुद्देबैठकीची निश्चित तारीख अजून नाही ठरली

पुणे : शेती आणि शहराच्या पाण्याचा ताळेबंद मांडणारी कालवा समितीची १५ आॅक्टोबरच्या दरम्यान होणारी बैठक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. शेतीचे आवर्तन आणि शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन या बैठकीत होणार आहे. 

सप्टेंबर महिनाअखेरीस उपलब्ध असलेल्या धरणसाठ्याच्या आधारे पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे आरक्षण केले जाते. दरवर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत ही बैठक घेणे बंधनकारक असते. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित तारीख अजून निश्चित झाली नसली तरी दिवाळीनंतरच्या आठवड्यात ही बैठक होऊ शकते. 
खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणांतून पुणे शहरातील आणि लगतच्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांची उपयुक्त पाण्याची क्षमता २९.१४ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने सोमवारअखेर (दि. १४) चारही धरणांत मिळून २७.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात २५.४४ टीएमसी पाणी धरणांत शिल्लक होता. गेल्या मॉन्सूनमधे सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने धरणात पाणीसाठा कमी होता. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामीण-शहरी असा वाद झाला होता. 
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २०१७मध्ये पुणे शहराला मापदंडानुसार वार्षिक ८.१९ अब्ज घनफूट (दररोज ६३५ दशलक्ष लिटर) पाणी मंजूर केले आहे. कालवा सल्लागार समितीच्या ४ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ दशलक्ष लिटर) पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सध्या महापालिका दररोज १३५० ते चौदाशे एमएलडी पाणी वापरते. हा पाणीवापर वार्षिक १७ ते साडेसतरा टीएमसी इतका आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला लोकसंख्येसह पाण्याचा ताळेबंद सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे पाहिले जात आहे.
.......

प्रकल्पीय सिंचन क्षेत्र
प्रकल्प नाव                                                         क्षेत्र हेक्टरमध्ये
खडकवासला (सणसर जोड कालव्यासह)              ६२,१४६
जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना                   १३,८३५
टेमघर                                                                   १०००
एकूण खडकवासला प्रणाली                                   ७६,९८१ 
.........
आचारसंहितेमुळे कालवा समितीची ऑक्टोबर महिन्यात होणारी बैठक दिवाळीनंतर होईल. बैठकीची निश्चित तारीख अजून ठरली नाही. - विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग 

Web Title: Canal Committee meeting after Diwali : Code of Conduct problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.