कालवा दुरूस्तीचे काम शुक्रवारी पूर्ण होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 08:16 PM2018-10-04T20:16:43+5:302018-10-04T20:21:28+5:30

दांडेकर पूल परिसरात झालेल्या कालवा फुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. मात्र, फुटलेल्या ठिकाणच्या कालवा दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळे आले.

Canal correction work will be completed on Friday | कालवा दुरूस्तीचे काम शुक्रवारी पूर्ण होणार 

कालवा दुरूस्तीचे काम शुक्रवारी पूर्ण होणार 

Next
ठळक मुद्देकालवा फुटीमुळे दांडेकर पूल परिसरात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचा संसार रस्त्यावरगेल्या चार दिवसांपासून कालवा दुरूस्तीचे काम करण्यासाठी सुमारे १०० ते १२५ कर्मचारी व अधिकारी

पुणे : दांडेकर पूल परिसरात झालेल्या कालवा फुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. मात्र, फुटलेल्या ठिकाणच्या कालवा दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळे आले. त्यामुळे दुरूस्तीच्या कामाला एक दिवस विलंब झाला. परंतु, शुक्रवारी (दि.५) दुरूस्तीचे काम पूर्ण होईल, असा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
कालवा फुटीमुळे दांडेकर पूल परिसरात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांचा संसार रस्त्यावर आला. त्याचप्रमाणे खडकवासल्यातून कालव्याद्वारे इंदापूरला शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी कालवा फुटल्यामुळे बंद करावे लागले. त्यातच कालव्यातून लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी उपलब्ध करून दिले जाणारे पाणी बंद झाल्याने शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. काही भागात सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहिला.
पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता तानाजी जगताप म्हणाले, मॅकॅनिकल विभाग, जलसंपदा विभाग आणि महानगरपलिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी फुटलेला कालवा तात्कळ दुरूस्त करण्याबाबत युध्दपातळीवर काम सुरू केले. सुमारे १०० ते १२५ कर्मचारी व अधिकारी गेल्या चार दिवसांपासून कालवा दुरूस्तीचे काम करत आहेत. गुरूवारीच कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, बुधवारी रात्री दांडेकर पूल परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळे निर्माण झाले.
कालव्याची फुटलेली भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, तयार केलेल्या आराखड्यानुसार भिंतीच्या भोवती मातीचा भराव टाकण्याचे काम पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाही. शुक्रवारी कालवा दुरूस्तीचे सर्व काम पूर्ण होईल. तसेच कालव्यात पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

Web Title: Canal correction work will be completed on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.