कालव्यावरील शेती संकटात!
By Admin | Published: April 2, 2016 03:25 AM2016-04-02T03:25:27+5:302016-04-02T03:25:27+5:30
खडकवासला कालव्याला आवर्तन न सुटल्याने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील शेती अडचणीत आली आहे. या गावांमधील ऊसशेतीसह डाळींब, द्राक्षबागांची हजारो हेक्टर शेती
बारामती : खडकवासला कालव्याला आवर्तन न सुटल्याने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील शेती अडचणीत आली आहे. या गावांमधील ऊसशेतीसह डाळींब, द्राक्षबागांची हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठीदेखील येथील अनेक गावे तहानलेली आहेत.
खडकवासला कालव्यावर या परिसरातील शेटफळगढे, पोंदवडी, निरगुडे, अकोले, वायसेवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, उरुळी, मराडेवाडी, न्हावी, बळपुडी, लोणी देवकर, व्याहळी, कौठळी, वरकुटे, बिजवडी, वडापुरी, पोंधकुलवाडी, बेडसिंगे या गावांसह ३६ गावांमध्ये पाण्याअभावी भीषण परिस्थिती ओढवली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून खडकवासला कालव्याला पाणीसाठ्याअभावी आवर्तन सुटलेले नाही. दोन महिन्यांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. या कालव्यांतर्गत परिसरातील ४५ तलाव पिण्याच्या पाण्यासाठी भरण्यात येतात. सध्या हे तलाव कोरडे पडले आहेत. अनेक गावांना पिण्यासाठी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
या गावांमधील हजारो हेक्टर ऊस जळून जाण्याच्या मार्गावर आहे. तर शेकडो एकर डाळींब आणि द्राक्षबागादेखील नष्ट होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी यंदा फळबागांचा बहार धरला नाही. केवळ बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दुष्काळ यंदा चांगलाच परिणामकारक ठरला आहे. पिके जळून गेल्याने या गावांमधील आर्थिक गणिते बदलली आहेत. उत्पन्न न मिळाल्याने शेतकऱ्यांवर बिकट अवस्था ओढवली आहे.
ऐन दुष्काळात डाळिंबाचे दर प्रथमच मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना बागा जगवूनदेखील हाती काहीच लागलेले नाही.
निर्यातीसाठी माल तयार नसल्याने सर्व डाळिंब स्थानिक बाजारपेठेत आवक झाली आहे. परिणामी डाळिंबाचे दर घसरले आहेत. काही शेतकऱ्यांचा डाळिंबाचा उत्पादनखर्च देखील वसूल झालेला नाही. (प्रतिनिधी)
आगामी काळातही खडकवासला कालव्याला पाणी मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे येथील शेतकरी कायमस्वरूपी अडचणीत आल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात योग्य पद्धतीने पाणी साठवून पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तरच भविष्यकाळात खडकवासला कालवा परिसरातील शेतकऱ्याला भवितव्य आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून मिळणारे पाणी अद्याप मिळालेले नाही. भामा-आसखेडचे पाणी पुणे शहराला पिण्यासाठी मिळाल्यावर येथील शेतीला काही प्रमाणात पाणी मिळून दिलासा मिळेल.
- भजनदास पवार, डाळिंब उत्पादक शेतकरी