‘एमआयएम’ची मान्यता रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2016 02:59 AM2016-03-18T02:59:47+5:302016-03-18T02:59:47+5:30
भारतात राहायचे, आमच्याच मतांवर निवडून यायचे अन् देशविरोधी वक्तव्य करायचे, ही कोणती पद्धत? भारतात राहायचे असेल, तर देशाभिमान बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा
कोरेगाव भीमा : भारतात राहायचे, आमच्याच मतांवर निवडून यायचे अन् देशविरोधी वक्तव्य करायचे, ही कोणती पद्धत? भारतात राहायचे असेल, तर देशाभिमान बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करतानाच त्याला खासदार ओवैसी यांना देशातून हद्दपार करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांनी येथील निषेध सभेत केली.
खासदार असदुद्दीन ओवैसी व आमदार वारिस पठाण यांनी ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार दिल्याने राज्यात मोठे वादळ उठले आहे. आज सकाळी शिवसेना पुणे जिल्हा व शिरूर-हवेली तालुक्याच्या वतीने कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील शिवाजी चौकामध्ये निषेध सभा व ओवैसी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्याप्रसंगी गावडे बोलत होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, शिरूर तालुकाप्रमुख पोपट शेलार, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख, हवेली तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, शहरप्रमुख संजय देशमुख, उपतालुकाप्रमुख मधुकर भंडारे, रोहिदास शिवले, अमोल हरगुडे, वडगावशेरी महिला आघाडी प्रमुख अमृता पठारे, तालुका उपप्रमुख अलका सोनवणे, संगीता विकारे, मंजुळा सासवडे, स्वप्नाली टाकळकर व असंख्य शिवसैनिक व महिला उपस्थित होते. या वेळी सभेनंतर ओवैसी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
गावडे म्हणाले, ‘‘भारताला १५० वर्षे स्वातंत्र्यलढ्याची परंपरा असल्याने प्रत्येक देशवासीयाच्या नसानसांत वंदे मातरम भिनत आहे. परंतु ओवैसी व एमआयएम पक्षाचे आमदार भारतात राहून देशविरोधी कारवाया करत आहेत. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध करतानाच आता ‘भारतमाता की जय’ म्हणण्यासही नकार दिल्याने त्याच्यावर शासन कारवाई करेल की नाही याची वाट शिवसेना पाहणार नाही. भारतात राहायचे असेल तर देशाभिमान बाळगणे गरजेचे असून, शासन कारवाई करत नाही ही शोकांतिका असल्याने भारत आता सहिष्णुतेकडून असहिष्णुतेकडे चालला आहे काय?’’
पोपट शेलार यांनी देशात राहूनही देशाभिमान बाळगण्यास लाज वाटत असेल तर पाकिस्तानात जा, असे मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन साईनाथ गव्हाणे यांनी केले, संजय देशमुख यांनी आभार मानले.
हार्दिक पटेलच्या आंदोलनात देशाचा ध्वज पडला. देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर नोंदविला. मात्र, ओवैसी व त्याच्या पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने देशविरोधी वक्तव्य केली जाऊनही देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जात नाही, ही शोकांतिका असून, शासनाचे दुटप्पी धोरण यातून स्पष्ट असल्याचे राम गावडे यांनी सांगितले.