Rupee Bank: रूपी बँकेचा परवाना रद्द! पुण्यातील साडेचार हजार ज्येष्ठांचे '३५० कोटी बुडाले’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 03:21 PM2022-08-12T15:21:45+5:302022-08-12T15:22:02+5:30

बँकेला आता दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही

Canceled the license of Rupi Bank 350 crore lost to 4500 seniors in Pune | Rupee Bank: रूपी बँकेचा परवाना रद्द! पुण्यातील साडेचार हजार ज्येष्ठांचे '३५० कोटी बुडाले’

Rupee Bank: रूपी बँकेचा परवाना रद्द! पुण्यातील साडेचार हजार ज्येष्ठांचे '३५० कोटी बुडाले’

googlenewsNext

पुणे : रूपी बँकेचा व्यवसायाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मोकळी झाली खरी. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे ४ हजार ५०० ज्येष्ठ नागरिकांचे तब्बल ३५० कोटी रूपये बुडीत खाती जमा होणार आहेत. यातील बहुतेकांचा निवृत्तीकाल या बँकेत ठेवलेल्या या ठेवींच्या व्याजावरच सुरू होता. आता व्याजही गेले व पैसेही गेले अशी वेळ त्यांच्यावर आली आहे.

मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या रूपी सहकारी बँकेचा व्यवसाय करण्याचा परवाना अखेर आरबीआयने २२ सप्टेंबर २०२२ नंतर रद्द केला आहे. त्यामुळे बँकेला आता दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. सहकार आयुक्तांकडून आता त्यासाठी एका अधिकाऱ्याची किंवा एखाद्या समितीची नियुक्ती केली जाईल. ही समिती बँकेचे आर्थिक मूल्यमापन करेल. त्यानंतर त्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, त्याआधी ठेव सुरक्षा विमा महामंडळाचे पैसे ते काढून घेतील.

ठेव सुरक्षा महामंडळाने ६४ हजार ठेवीदारांना कमाल ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत केली आहे. म्हणजे १ कोटी रुपये ठेव असली तरीही त्या ठेवीदाराला ५ लाख रुपयेच मिळाले आहेत. ५ लाखांपेक्षा कमी ठेव असेल तर त्याची जेवढी रक्कम आहे ती परत करण्यात आली आहे. परत करण्यात आलेली ही रक्कम ७०० कोटी रुपयांची आहे असे बँकेच्या प्रशासक मंडळाकडूनच अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

बँकेत ८४० कोटीच शिल्लक

बँकेत आता ८४० कोटी रुपये शिल्लक आहेत. बँकेची मालमत्ता ८० कोटी रुपयांची आहे. वर्ष-दोन वर्षांत हमखास कर्ज वसूल होईल अशी रक्कम १०० कोटी रुपयांची आहे. दिवाळखोरी जाहीर झाली की, यातून ठेव सुरक्षा विमा महामंडळ सर्वप्रथम त्यांनी दिलेले ७०० कोटी रुपये काढून घेईल. त्यानंतर जमा रकमेतून इतर देणी भागवली जातील. त्यानंतर उर्वरित ठेवीदारांना त्यांची ठेव परत करण्यासाठी बँकेकडे पैसेच राहणार नाहीत, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

१ कोटींची ठेवी असलेले अनेकजण

मोठ्या रकमेच्या ठेवी असलेले बँकेचे तब्बल ४ हजार ५०० ठेवीदार आहेत. त्यांचीच एकत्रित रक्कम ३५० कोटी रुपये इतकी आहे. बँकेची मालमत्ता तसेच शिल्लक पैसे अन्य कारणांसाठी वापरले गेले तर या ठेवीदारांचे पैसे कशातूनच देता येणे शक्य होणार नाही. यात १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेले अनेक ठेवीदार आहेत. त्याशिवाय २० लाखांपासून पुढील रकमेच्या ठेवी असणारेही अनेकजण आहेत.

आता सर्व पैसे गेले

बहुसंख्य ठेवीदार ज्येष्ठ नागरिक आहेत. नोकरीतील किंवा व्यवसायातील निवृत्तीनंतर साठवलेली रक्कम त्यांनी ठेव म्हणून बँकेत ठेवली. त्यापासून मिळणाऱ्या व्याजावरच त्यांचा निर्वाह सुरू होता. त्यालाच आता खीळ बसली आहे. तशी तर ती बँक आर्थिक अडचणीत आली तेव्हापासूनच बसली होती. मात्र, काहीतरी आशा होती. तीसुद्धा आता संपुष्टात आली आहे. हे पैसे त्यांनी बुडीतच समजावेत, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Canceled the license of Rupi Bank 350 crore lost to 4500 seniors in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.