मेडिकलची सीईटी रद्द केल्याने गोंधळ

By admin | Published: May 8, 2016 03:31 AM2016-05-08T03:31:09+5:302016-05-08T03:31:09+5:30

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे प्रवरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स या अभिमत विद्यापीठाची वैद्यकीय प्रवेशपरीक्षा ऐन परीक्षेच्या दिवशी अचानकपणे रद्द करण्यात आली.

The cancellation of medical CET canceled | मेडिकलची सीईटी रद्द केल्याने गोंधळ

मेडिकलची सीईटी रद्द केल्याने गोंधळ

Next

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे प्रवरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स या अभिमत विद्यापीठाची वैद्यकीय प्रवेशपरीक्षा ऐन परीक्षेच्या दिवशी अचानकपणे रद्द करण्यात आली. परिणामी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला.
प्रवरा इन्स्टिट्यूटमधील वैद्यकीय प्रवेशासाठी ७ मे रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत पुण्यातील केंद्रावर परीक्षा घेतली जाणार होती. त्यानुसार राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी प्रवेशपरीक्षा देण्यासाठी पुण्यात आले होते; मात्र परीक्षा केंद्रावरील नोटीस बोर्डावर शनिवारी होणारी परीक्षा रद्द केल्याचे आणि प्रवेशपरीक्षा लांबणीवर टाकण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड झाला.
गेल्या काही दिवसांपासून देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा घ्यावी, याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे अभिमत व खासगी विद्यापीठांना वैद्यकीय प्रवेशासाठी परीक्षा घेता येत नाही. नीटबाबत न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही विद्यापीठांनी प्रवेशपरीक्षा राबवू नये, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रवरा इन्स्टिट्यूटने शनिवारी होणारी
प्रवेशपरीक्षा रद्द केली आहे.
प्रवराच्या अभिमत विद्यापीठात एमएमबीएस व बीडीएस प्रवेशासाठी सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानुसार राज्यात सर्व ठिकाणी परीक्षा केंद्र्र निश्चित करण्यात आले होते. पुणे शहरातही काही परीक्षा केंद्रांवर प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार होती. त्यासाठी नांदेड, परभणी, अमरावती, कोल्हापूर आदी ठिकाणांहून विद्यार्थी आले होते; मात्र परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
गौरव सायरे हा विद्यार्थी म्हणाला की, मी प्रवेशपरीक्षेसाठी अमरावतीहून पुण्यात आलो; मात्र या ठिकाणी आल्यानंतर, परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठाने परीक्षा रद्द झाल्याचे विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविणे अपेक्षित होते. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी दिले होते; मात्र विद्यापीठाने कोणतीच हालचाल केली नाही. आता प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी भरलेली रक्कम विद्यापीठाने परत करावी. दरम्यान, बेळगाव येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन युनिव्हर्सिटीच्या मेडिकलच्या जागांसाठी पुण्यात धनकवडी येथील पीआयसीटी कॉलेजमध्य ेशनिवारी २ ते ५ या कालावधीत सीईटी परीक्षा घेतली जाणार होती; मात्र ही परीक्षा एमबीबीएस आणि डेन्टलसाठी घेतली जात नाही, असे विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ प्रशासन लिहून घेत होते. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. विद्यार्थ्यांनी भरलेली रक्कम त्यांना परत द्यावी, अशी मागणी अजित सांगळे या पालकाने केली.

संस्थेचे विश्वस्त राजेंद्र विखे-पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश रात्री उशिरा प्राप्त झाले. येत्या ९ तारखेला होण्याऱ्या सुनावणीपूर्वी कोणत्याही खासगी व अभिमत विद्यापीठाने वैद्यकीय प्रवेशासाठी परीक्षा प्रक्रिया राबवू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आम्ही शनिवारी होणारी प्रवेशपरीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: The cancellation of medical CET canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.