आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर बदली रद्द, नगरपालिका प्रशासनाची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:21 AM2018-10-05T01:21:24+5:302018-10-05T01:21:54+5:30
नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक तसेच शिक्षकवर्गाकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असून, यासंदर्भात न्याय मिळावा म्हणून
जुन्नर : सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या बेबीनंदा अडसूळ यांची आरोग्य विभागात रस्ते सफाई कर्मचारी म्हणून केलेली बदली अडसूळ यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर जुन्नर नगरपालिका प्रशासनाने तातडीने रद्द केली. अडसूळ यांना आता नगरपालिकेच्या कार्यालयात चतुर्थ श्रेणी समकक्ष कामावर नियुक्ती केल्याचे आदेश देण्यात आले.
नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक तसेच शिक्षकवर्गाकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असून, यासंदर्भात न्याय मिळावा म्हणून दि. २ रोजी अडसूळ यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. खासगी महत्त्वाच्या कामासाठी १० दिवसांची रजा मागितली असता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी उद्धट भाषेत उत्तर दिले. मला कार्यालयातून हाकलून दिले असा आरोप अडसूळ यांनी केला. नाकारलेली रजा व मुख्याधिकारी यांनी दिलेली अपमानास्पद वागणूक यासंदर्भात त्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्याकडे निवेदन दिले होते. निवेदनात प्रामाणिकपणे सेवा करत असतानाही माझ्याविरोधात मुख्याध्यापक व शिक्षक खोट्या तक्रारी करत असतात. त्यामुळे मला आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले होते. नगराध्यक्ष शाम पांडे यांनी अडसूळ यांच्या बदलीबाबत मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ही बदली रद्द करण्यात आल्याचे समजते.