निविदा न काढताच सुरू केलेले काम अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:57 AM2018-03-14T00:57:26+5:302018-03-14T00:57:26+5:30
कामाची निविदा न काढताच भवानी पेठ येथे सुरू करण्यात आलेले रस्त्यांचे काम अखेर रद्द करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आदेशामुळे पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी रोखली गेली
पुणे : कामाची निविदा न काढताच भवानी पेठ येथे सुरू करण्यात आलेले रस्त्यांचे काम अखेर रद्द करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आदेशामुळे पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी रोखली गेली खरी; पण आता खोदलेला रस्ता पूर्ववत कधी आणि कसा करणार हा मोठा प्रश्नच आहे. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल. तसेच खोदलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्चदेखील ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भवानी पेठ येथील एका रस्त्याचे काम निविदा प्रक्रिया न राबवताच सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे एकाच कामासाठी तीन निविदा काढण्यात आल्या असल्याचे समोर आले होते. भाजपाच्या नगरसेवकांनी ही कामे करण्यास सांगितली असल्याची बाब समोर आली आहे. हे प्रकरण उघड होताच प्रशासनाने आता या कामासाठी काढण्यात आलेल्या तीनही निविदा रद्द करून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला.
याबाबत महापौर टिळक यांनी सांगितले की, रस्ता खोदून
ठेवला असल्यामुळे नागरिकांना
त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. काम करण्यामध्ये सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. अशा गोष्टींवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी कोणी रस्ता खोदला आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येतील असे टिळक यांनी सांगितले.
।संगममताने लूट होत असल्याचा आरोप
महापालिका प्रशासनाने हरीभाऊ गॅरेज परिसर काँक्रिटीकरण करणे १० लाख रुपयांचे काम, बापूसाहेब पवार कन्या शाळेमागील रस्ता काँक्रिटीकरण करणे २० लाख, रशिद शेख यांच्या निवासस्थानासमोरील रस्ता यूटीडब्ल्यू पद्धतीने विकसित करणे २० लाख, भवानी पेठ हाऊसिंग सोसायटी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे २० लाख, प्रभाग १९ ब मधील विविध विकासकामे करणे १५ लाख अशी १९ ब आणि क मधील कामे रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता पालिकेचे अधिकारी आणि राजकारणी यांच्या संगनमताने पालिकेची लूट होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.