... ठेकेदारांची कामे रद्द करणार : महापालिका प्रशासनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 07:00 AM2019-10-01T07:00:00+5:302019-10-01T07:00:07+5:30
शहरामध्ये पूरानंतर मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, यासाठी महापालिकेला हजारो कामगारांची आवश्यकता आहे.
पुणे : शहरामध्ये पूरानंतर मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, यासाठी महापालिकेला हजारो कामगारांची आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने महापालिकेच्या विविध खाजगी ठेकेदारांना क्षेत्रीय कार्यालयनिहय मनुष्यबळ पुरविण्याचे आवाहन केले होते. परंतु, याकडे बहुतेक ठेकेदारांने दुर्लक्ष केले. यामुळे सोमवारी महापालिका प्रशासनाने मंगळवार (दि.१) रोजी सकाळपर्यंत अपेक्षित मनुष्यबळ न पुरविल्यास ठेकेदारांची कामे रद्द करण्यात येतील, असा इशाराच दिला आहे.
शहरामध्ये बुधवारी (दि.२५) रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. या पूरानंतर फार मोठ्या परिसराची स्वच्छता, चिखल साफ करणे, राडारोडा उचलणे, पूराच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा, मृत जनावरे, घरांतील साहित्य, गाड्या विल्हेवाट लावण्याचे मोठे आवाहन प्रशासनाच्या समोर आहे. यासाठी महापालिकेला हजारो कामगाराची आवश्यकता असून, महापालिकाचे कर्मचारी, स्वच्छ संस्थेसोबत महापालिकेचे खाजगी ठेकेदार, पुणे मेट्रो, पीएमआरडीए, क्रिडाई आदी विविध संस्थांकडून अधिकचे मनुष्यबळ पुरविण्याची विनंती करण्यात आली होती. याबाबत महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या भागातील ठेकेदारांना मनुष्यबळ पुरविण्यासाठी विशिष्ट टार्गेट दिले होते. परंतु दोन दिवसांनंतर देखील महापालिकेच्या आदेशाकडे बहुतेक ठेकेदारांनी दुर्लक्ष केले आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संपूर्ण पूरग्रस्त भागाच्या स्वच्छतेसाठी २ ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे. पंरतु यासाठी आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध न झाल्यास ही डेडलाईन पाळणे कठीण होईल. या पार्श्वभूमीवर सोमवारी घनकचरा विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी महापालिकेच्या सर्व अभियंत्यांची बैठक घेऊन जे ठेकेदार मंगळवार सकाळपर्यंत मनुष्यबळ देणार नाही, त्याची कामे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले.
-----------------------
ठेकेदारांकडून १ हजार ७२५ मनुष्यबळाची अपेक्षा
नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय -२००, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय -१००, ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालय-१००, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय-२२५, शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय-५०, कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालय-१००, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय-१००, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय-१५०, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय-१५०, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय-१५०, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय-१५०, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय-१५०, कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय आणि विबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय-१००, असे एकूण १ हजार ७२५ मनुष्यबळ पुरविण्याचे आदेश महापालिकेने ठेकेदारांना दिले आहेत. .....