चिंताजनक! पुणे जिल्ह्यात नदीच्या दुषित पाण्यामुळे वेगात पसरतोय कॅन्सर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 04:37 PM2022-11-12T16:37:47+5:302022-11-12T16:40:02+5:30
नारायणगाव परिसरात दहा कुटुंबांमध्ये एक तरी कॅन्सरग्रस्त...
- श्रीकिशन काळे
पुणे : मीना नदीकाठी राहणे धोकादायक बनले आहे. कारण माणसांनीच प्रदूषण वाढविले आणि नद्या प्रदूषित झाल्या. रासायनिक औषधांचा मारा प्रचंड होत आहे. त्याने जमिनीतून पाणी झिरपत नद्यांना मिळतेय. परिणामी मीना नदीत जस्त, मक्युरी, पारा असे धातू आणि कीटकनाशके दिसून आली. यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. नारायणगाव परिसरात दहा कुटुंबांमध्ये एक तरी कॅन्सरग्रस्त असल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नारायणगाव परिसरातील मीना नदीच्या प्रदूषणाबाबत गेल्या तीन महिन्यांपासून सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील एनसीएलचे (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे, जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, यशदाचे जलसाक्षरता अभियानाचे माजी कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुजित निलेगावकर, स्वाती दीक्षित, वीणा पाटील आदींनी सहभाग घेतला. या टीमने मीना नदीच्या उगमापासून घोड नदीच्या संगमापर्यंतच्या नदीकाठची पाहणी केली. तेथील पाण्याचे नमुने घेतले. त्यातील प्रदूषण तपासले. पावसाळ्याअगोदर काही नमुने घेतले आणि पावसाळ्यात काही नमुने घेतले. त्यानंतर प्रयोगशाळेत त्यात काेणते प्रदूषण आहे ते पाहिले. या पाण्यात घातक धातू असल्याचे स्पष्ट झाले. प्रदूषित पाणी शेतीसाठी वापरले जाते. विहिरींचे पाणी खराब झाले, त्याने मानवी आरोग्य धोक्यात आले.
तीन महिने नदीवर काम
नारायणगावातून ही मीना नदी वाहते. प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग म्हणून या नदीवर तीन महिने सर्वेक्षण केले. नदीचा परिसर ५५ किमीचा आहे. तिथे कुठेही कारखाने नाहीत. केवळ एक साखर कारखाना आहे. त्यामुळे उद्योगाचे प्रदूषण नदीमध्ये नाही. कृषिक्षेत्र आणि घरगुती पाण्यातून प्रदूषण होत आहे. शेतात रासायनिक औषधांचा भडिमार केला जात आहे. तेच झिरपून नदीला मिळते, तर घरांमध्ये टुथपेस्ट, फिनेल, कपडे धुण्यासाठीचा डिटर्जंट, शाम्पू आदी केमिकलयुक्त वस्तूंच्या वापराने नदी घाण होत आहे. त्यातूनच जस्त, मक्युरी, पारा नदीच्या पाण्यात येत आहे. तसेच विहिरींमध्येही प्रदूषण पाहायला मिळते. याचा परिणाम कॅन्सर होत आहे.
सोप्या पध्दतीने पाणी शुध्द !
ग्रामीण भागात काही उपाय करता येतील. ते म्हणजे शेवगा व निर्मळी या दोघांच्या बिया उत्तमपणे पाणी शुध्द करतात. शेवग्याच्या बीची एक ग्रॅम पावडर एक लीटर पाणी निर्जंतूक करते. पाण्यातील क्षार, टीडीएस कमी करते. गाळ खाली बसवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण खूप कमी करते. फ्लोराईड मानवी आरोग्याला खूप घातक आहे. तोंडातले दात गायब करते. हाडे ठिसूळ होऊन संधीवात, अस्थिभंग, पाठदुखी हे विकार होतात. चालणेही मुश्किल होते. उच्च रक्तदाब, त्वचारोग, वंध्यत्व, थायराइड असे विकार होतात.
- डॉ. प्रमोद मोघे, निवृत्त शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा