आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:03+5:302021-09-26T04:13:03+5:30
पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध पदांच्या भरतीसाठी घेतली जाणारी परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे उमेदवारांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे ...
पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध पदांच्या भरतीसाठी घेतली जाणारी परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे उमेदवारांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. काही उमेदवार तर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे मोबाईलवर एसएमएस मिळाले. परीक्षा केंद्र बदलाच्या गोंधळानंतर परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केला.
कोरोनामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदांचे वास्तव समोर आले. त्यामुळे राज्य शासनाने आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. मात्र, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या जिल्ह्याऐवजी त्यांना दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले. एका विद्यार्थ्याला तर उत्तर प्रदेश येथील केंद्र दिले गेले. त्यामुळे उमेदवारांनी संतापाची भावना व्यक्त केली. परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री पावणे अकराच्या सुमारास परीक्षा रद्द करण्याबाबत संदेश पाठविण्यात आले.
रियाज पठाण म्हणाला, परीक्षेसाठी पुणे, अकोला, ठाणे, लातूर या जिल्ह्यांची निवड केलेली असताना मला नांदेड येथील केंद्र देण्यात आले. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी रात्री बस प्रवास करत अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचल्यावर मला परीक्षा रद्द झाल्याची माहिती समजली. त्यानंतर मला पुन्हा घरी परतावे लागले.
सुशांत पवार म्हणाला, पुण्यात अभ्यास करत असल्याने पुण्यातील परीक्षा केंद्र मिळावे यासाठी मी अर्जात नोंद केली होती. परंतु, मला सातारा केंद्र मिळाले. पहाटे मी परीक्षा केंद्रावर जाणार होते. त्यापूर्वी रात्री उशिरा परीक्षा रद्द झाल्याचे समजल्याने मोठा मनस्ताप झाला.
अजित पाटील म्हणाला, मला सांगली येथील परीक्षा केंद्र मिळणे अपेक्षित होते. मात्र, अर्ज भरताना साताऱ्यातील केंद्रांची नावे जाहीर केली नाही. त्यामुळे मला कोल्हापूर येथील केंद्र देण्यात आले. परंतु, परीक्षा रद्द झाल्याने मोठा संताप झाला.