पदयात्रा, भेटींवर उमेदवारांचा भर
By admin | Published: February 16, 2017 03:31 AM2017-02-16T03:31:14+5:302017-02-16T03:31:14+5:30
प्रभागरचनेमुळे मतदारसंघाचे वाढलेले क्षेत्र आणि मतदारसंख्या यामुळे उमेदवारांचा प्रचारात कस लागत आहे. चार उमेदवारांमुळे
पुणे : प्रभागरचनेमुळे मतदारसंघाचे वाढलेले क्षेत्र आणि मतदारसंख्या यामुळे उमेदवारांचा प्रचारात कस लागत आहे. चार उमेदवारांमुळे निवडणुकीत चुरसही वाढल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. त्यासाठी नेत्यांच्या सभांपेक्षा पदयात्रा, रोड शो आणि वैयक्तिक भेटीगाठींवरच अधिक भर दिला जात आहे.
मतदानाला केवळ पाच दिवस शिल्लक राहिल्याने शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला जोर आला आहे. प्रभाग रचनेमुळे मतदारांची संख्या वाढली असून क्षेत्रही मोठे झाले आहे. पूर्वी वॉर्डरचनेमुळे मर्यादित लोकसंख्या व क्षेत्रामुळे प्रचार करण्यास फारसे कठीण जात नव्हते. आता प्रभागांमुळे चारही उमेदवारांना एकत्रित प्रचार करताना दमछाक होत आहे. असे असले तरी बहुतेक पक्षांंच्या उमेदवारांनी पदयात्रा आणि थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. प्रचार संपण्यास सात-आठ दिवस राहिल्यानंतर प्रमुख पक्षांच्या सभांना सुरुवात झाली. मात्र, याचे प्रमाणही खूप कमी असून आतापर्यंत मोजक्याच बड्या नेत्यांच्या सभा झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा झाल्या आहेत. त्यापैकी बहुतेक सभा उपनगरांमध्ये झाल्याचे दिसते. आता प्रचार संपण्यास केवळ चार दिवस उरले आहेत.