उमेदवाराच्या घरी भानामती?
By admin | Published: July 28, 2015 12:37 AM2015-07-28T00:37:47+5:302015-07-28T00:37:47+5:30
ग्रामपंचायती निवडणुकीसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, मतदारांना विविध आमिषे दाखविण्यात येत आहेत. इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावात या निवडणुकीतून
भिगवण : ग्रामपंचायती निवडणुकीसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, मतदारांना विविध आमिषे दाखविण्यात येत आहेत. इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावात या निवडणुकीतून भानामतीचा प्रकार घडल्याची चर्चा आहे. एका महिला उमेदवाराच्या घराचा उंबरा पुजल्याने येथे खळबळ उडाली आहे.
या प्रकारातून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उमेदवाराला घाबरविण्यासाठी केलेल्या या प्रकाराची परिसरात चर्चा आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावातील राजपीर वर्धनी माता पॅनलच्या दोन नंबर वार्डाच्या महिला उमेदवार अनिता परदेशी यांच्या घरासमोरील उंबरा अज्ञात व्यक्तीने हळद, कुंकू, गुलाल टाकून पुजला. त्यानंतर उंबऱ्यावर १०० रुपयांची नोट ठेवली होती. सकाळी ७ वाजता झोपेतून उठल्यावर परदेशी यांच्या हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. परदेशी यांनी लागलीच हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आणून दिला.
याविषयी परदेशी त्यांनी हा प्रकार घरातील सदस्यांना घाबरविण्याच्या हेतूने अज्ञाताने केलेला असण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच, अशा प्रकारांना आपले कुटुंब घाबरणार नाही. अशा प्रकारांना महत्त्व देणार नाही. आपली काही तक्रार नाही. तक्रारवाडी गावात पहिल्यांदाच अंधश्रद्धेचा हा प्रकार घडला.
हा प्रकार म्हणजे भानामती असल्याची चर्चा दिवसभर गावात होती. दोन पॅनलमधील उमेदवारांत संभ्रम निर्माण होण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केला असल्याने याबाबत पोलीस ठाण्यात कसलीही तक्रार दाखल केली नसल्याचे परदेशी यांनी सांगितले. (वार्ताहर)