उमेदवारांनो, मतदारांना नमस्कार पडेल महागात
By admin | Published: February 20, 2017 02:27 AM2017-02-20T02:27:11+5:302017-02-20T02:27:11+5:30
ओळखीचा असो वा नसो, मतदार दिसले, की राजकारणी व्यक्तींद्वारा नमस्कार करण्याचा मोह आवरणे कठीण होते.
कान्हूर मेसाई : ओळखीचा असो वा नसो, मतदार दिसले, की राजकारणी व्यक्तींद्वारा नमस्कार करण्याचा मोह आवरणे कठीण होते. त्यातच निवडणुका म्हटल्या, की उमेदवारांचे हात जोडलेलेच असतात. मात्र, या मोहाला आता आवर घालावा लागणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात उमेदवारांना मात्र नमस्काराला विसरावे लागणार आहे.
मतदान केंद्र परिसरात उमेदवाराने मतदाराला नमस्कार करणे हा प्रचाराचा भाग समजला जाणार आहे. या ठिकाणी उमेदवाराने मतदाराला नमस्कार केल्यास त्या उमेदवारावर पोलीस कारवाई होऊ शकते. हादेखील आचारसंहिताभंगाचा भाग समजण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या वेळी या विषयीचे निर्देश आयोगाने दिले होते. अर्थात, याबाबत कुठेही कारवाई झाली नसली, तरी हेच नियम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कायम असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले. उमेदवारांना मतदान केंद्रात प्रवेश करण्याची जी मुभा दिली आहे, त्याचा अनेक ठिकाणी गैरवापर होतो किंबहुना, केला जातो. त्यामुळे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत उमेदवार असला, तरी त्याला स्वत:ची ओळख विसरावी लागणार आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत उमेदवाराने मतदारांना स्वत:ची ओळख करून देणे, मतदाराच्या रांगेजवळ जाऊन चौकशी करणे, स्वत:चा परिचय देणे, नमस्कार करणे किंवा मतदान केंद्रात वाजवीपेक्षा अधिक वेळ थांबणे या सर्व प्रकाराला त्याला आवर घालावा लागणार आहे. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत कोणत्याही व्यक्तीला उमेदवाराने स्वत:ची ओळख करून देऊ नये व नमस्कार करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
मतदान सुरू असताना आमदार, खासदारांद्वारा मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी फिरल्या जात असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आयोगाने या प्रकारालाही मनाई केली आहे. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदारांना केवळ संबंधित केंद्रावर, मतदान केंद्रावर फक्त मतदान करण्यासाठीच जाता येणार आहे़