जवाब दाे जवाब दाे....माेदी सरकार जवाब दाे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 09:11 PM2018-08-19T21:11:08+5:302018-08-19T21:12:45+5:30
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 आॅगस्ट रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला महर्षी शिंदे पूलावर कॅंडल मार्च काढण्यात आला.
पुणे : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 आॅगस्ट रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. त्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला महर्षी शिंदे पूलावर कॅंडल मार्च काढण्यात आला. यात युवकांची संख्या लक्षणीय होती. फुले, शाहु आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर, विचारांचा जागर विचारांनी करुया, या घोषणा देत त्यांनी दाभोलकरांच्या हत्येमागील मास्टरमाईंडला कधी अटक करणार असा प्रश्न पाेलिस प्रशासनाला केला. जवाब दो जवाब दो....मोदी सरकार जवाब दो अशी घोषणा देत मोर्चात सहभागी असणा-यांनी सरकारला धारेवर धरले.
सायंकाळी आठच्या सुमारास शिंदे पुलावर कँडल मार्च करिता गर्दी जमु लागली. यात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी हमीद दाभोलकर उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, दाभोलकर खुनाच्या तपासामध्ये उच्च न्यायालयाने देखरेख केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सतत पाच वर्षे 'जवाब दो' या विवेकी आंदोलनांच्या माध्यमातून जाब विचारत सरकारवर दबाव ठेवला आहे. आता दाभोलकर यांच्या खुनाच्या पूर्ण कटाचे चित्र सीबीआय लवकरच उघड करेल. अशी आहे. याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणात एका हल्लेखोराला पकडण्यात आल्याचे वृत्त ऐकले. गेली पाच वर्षे या प्रकरणाचा तपास सुरू होता. अडीच वर्षांपूर्वी पहिली अटक झाली होती. आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सचिन अंदुरे याला अटक केल्याने तपासाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
डॉ. दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरानजीक असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दुचाकीस्वार हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यातच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली होती. पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून गेली पाच वर्षे डॉ. दाभोलकर यांच्या मारेक -यांना पकडण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले होते. यानंतर सातत्याने 59 महिने शिंदे पूलावर अंनिस व इतर पुरोगामी संघटनांच्यावतीने मुक मोर्चा, निदर्शने आणि आंदोलने करण्यात आली.