मुळशी तालुक्यात चक्क गांजाची शेती; २५० झाडे, १७२ किलो गांजा हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 07:42 PM2021-10-23T19:42:47+5:302021-10-23T19:45:29+5:30
अमली पदार्थ विरोधीत पथकाने मोहोळ व म्हेत्रे याला शुक्रवारी कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयावरून गांजा विक्री करताना अटक केली होती
पुणे : मुळशी तालुक्यातील पौड जवळील गवळीवाडा अंबरवेट परिसरात चक्क गांजाची शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकांनी संयुक्त कारवाई करीत चौघांना जेरबंद केले. चेतन मारूती मोहोळ (वय २७, रा. कानिफनाथ सोसायटी, कोथरूड), साहेबा हुल्लाप्पा म्हेत्रे (वय २०, रा. कोथरूड), प्रकाश वाघोजी खेडेकर (वय ३५) आणि इंदुबाई वाघोजी खेडेकर (वय ६५, रा. दोघेही- गवळीवाड़ा, अंबरवेट, पौड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यावेळी त्यांच्याकडून गांजाची 250 झाडे, १८ किलो गांजा व इतर असा ११ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
अमली पदार्थ विरोधीत पथकाने मोहोळ व म्हेत्रे याला शुक्रवारी कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयावरून गांजा विक्री करताना अटक केली होती. त्यांच्याकडून ५८० ग्रॅम गांजा मिळाला होता. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी पौड परिसरातील अंबरवेट येथून गांजा आणल्याचे सांगितले.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, प्रकाश खांडेकर यांच्या पथकाने अंबरवेट येथे जाऊन प्रकाश खेडेकर याच्या घरी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये घराची झडती घेतली. त्यावेळी घरात १८ किलो ९९५ ग्रॅम ओलसर हिरवट, काळसर बोंडे, फांद्या, पाने मिळाली. या ठिकाणाहून खेडेकर दाम्पत्याला पकडून चौकशी केली. त्यावेळी घराजवळील जागेत गांजाची शेती केली असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी पोलिसांना २५० तयार गांजाची झाडे आढळून आली.
या ठिकाणाहून पोलिसांनी १५४ किलो गांजा जप्त केला. आरोपी इंदुबाई ही प्रकाशची आई आहे. ती काही वर्षापासून गांजाची झाडे लावून मिळेल त्या किंमतीत ती विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या वर्षी जून महिन्यात त्यांनी ही झाडे लावली होती. प्रकाश याला दोन भाऊ असून ते वेगळे राहतात. आई ही त्याच्याकडे असते. प्रकाश याचे लग्न झाले असून त्याला तीन मुले आहेत. तो अशिक्षित आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला