‘मसाप’च्या कार्यकारिणीवर आरोपांचा ‘तोफगोळा’! मुदतवाढ देऊनही झाली २ वर्षे, निवडणूक कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:02 AM2023-07-07T10:02:17+5:302023-07-07T10:02:34+5:30
मुदतवाढ देऊनही झाली दोन वर्षे : निवडणूक घेणार कधी? आजीव सभासदांचा सवाल...
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी मंडळाची मुदत संपून दोन वर्षे झाली. अद्याप निवडणूक घेतलेली नाही. आताची कार्यकारिणी खुर्ची सोडायला तयार नाही, असा आरोप मसापचे आजीव सभासद व कादंबरीकार विजय शेंडगे यांच्यासोबत इतर काही सभासदांनी केला आहे. आजीव सदस्यांचे अर्जही मंजूर करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मसापच्या कार्यकारिणी मंडळाची मुदत २०१६ ते २०२१ पर्यंतच होती. कोरोना काळात दोन वर्षे गेल्याने मुदतवाढीच्या प्रस्तावावर वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. त्या सभेतही चांगलाच गदारोळ झाला होता. कारण आजीव सभासदांनी त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर कार्यकारी मंडळ तेच राहिले. आता त्यालाही दोन वर्षे झाली आहेत. अद्याप निवडणुकीबाबत काहीही निर्णय झाला नसल्याचे आजीव सभासद सांगत आहेत.
वार्षिक सर्वसाधारण सभेतील गदारोळ आणि सदस्यांचा विरोध लक्षात घेता अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे यांनी एक समिती गठीत करण्याची घोषणा केली होती. ही समिती स्थापन झाली नसल्याचा आरोप आजीव सभासदांनी केला आहे. जर झाली असेल तर त्याचा कार्यवृत्तांत द्यावा, असा मागणी शेंडगे यांनी केली हाेती. त्यालाही काहीच उत्तर देण्यात आलेले नाही.
दर चार महिन्यांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेऊ आणि निवडणुका घेण्याजोगी परिस्थिती निर्माण होताच निवडणुका घेतल्या जातील, असे तेव्हा जाहीर केले होते. जर दोन वर्षांत निवडणुका घेतल्या नाही, तर मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा देईन, असेही परिषदेचे अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे यांनी जाहीर केले होते. त्यालाही दोन वर्षे झाली, पण त्यांनी राजीनामा दिलेला नाही.
- विजय शेंडगे, आजीव सभासद, मसाप
मसापच्या कार्यकारिणीला मुदतवाढ ही आजीव सभासदांची बैठक बोलावून दिलेली आहे. त्या बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी ही कार्यकारिणी काम करेल, असा निर्णय झालेला. आता दोन वर्षे पूर्ण झाली असून, अजून एक वर्ष शिल्लक आहे. आताच्या कार्यकारिणीत निवडून आलेले सभासद आहेत. आमच्या काळात मसापचे नूतनीकरण झाले, ते सर्वांना माहिती आहे. आम्ही निवडणुकीला घाबरत नाही. ज्यांनी तक्रार केली, ती नैराश्यातून केली आहे. त्यांना एका पुस्तकाला पुरस्कार मिळाला नाही म्हणून त्यांनी हे आरोप केले.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप