रेडिमेड माणसं मिळत नाहीत, तर ती घडवावीच लागतात : बाबासाहेब पुरंदरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 07:50 PM2020-01-06T19:50:53+5:302020-01-06T19:51:48+5:30
राज्य करायचे असेल, संस्था चालवायची असेल तर त्यासाठी आवड असावी लागते.
पुणे: बाजारात रेडिमेड वस्तू सर्वत्र मिळतात.मात्र, रेडिमेड माणसं मिळत नाही; ती घडवावीच लागतात. राज्य करायचे असेल, संस्था चालवायची असेल तर त्यासाठी आवड असावी लागते. ही आवड माजी सनदी अधिकारी धर्माधिकारी यांच्यात आहे, असे गौरवोद्गार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.
माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांची एकसष्टी निमित्त गणेश कला क्रीडामंच येथे आयोजित कार्यक्रमात पुरंदरे बोलत होते. या प्रसंगी धर्माधिकारी यांच्या 'आत्म्याचे नाव अविनाश' या शीर्षकाच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास प्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.राघुनाथ माशेलकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,सनदी अधिकारी बालाजी मंजुळे ,डॉ.अनिल गांधी, वर्षा गांधी, पुस्तकाच्या लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, मनोहर सोनावणे,संदीप तापकीर, कवी संदीप खरे, डॉ. भूषण केळकर,पूर्णा धर्माधिकारी, मंगला धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
माशेलकर म्हणाले, प्रशासनाला लागलेली भष्ट्राचाराची कीड दूर करण्यासाठी प्रशासनाला प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. तसेच प्रशासनात काम करणा-यांनी कार्यक्षम, संवेदनशील, प्रामाणिक पद्धतीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रातील युवक मोठ्या संख्येने प्रशासकीय सेवेत व संरक्षण दलात प्रवेश करत आहेत. प्रशासनात कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी घडविण्याचे काम अविनाश धर्माधिकारी करत आहेत.
विशाल सोळंकी, अरविंद सावंत म्हणाले,बालाजी मंजुळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कवी संदीप खरे यांनी कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. आरती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले.