पीक घेता नाही आलं अन् घरातलं धान्यही गेलं, आता जगायचं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 06:19 AM2019-11-07T06:19:05+5:302019-11-07T06:19:40+5:30
होते नव्हते ते सारे संपले : शिरूर तालुक्यातील वयोवृद्ध जोडप्यापुढे प्रश्न
श्रीकिशन काळे
पुणे : ‘‘चार-पाच एकर शेतीत यंदा पीक घ्यायचे होते. पण पावसानं सर्व पाणी फेरलंय. कारण शेतात पाणी असल्याने खूप गवत वाढलंय. त्याला दुरूस्त करायला पैसेही नाहीत. घरात असलेलं पोतंभर धान्यही भिजल्यानं ते टाकून द्यावं लागलं. आसरा नसल्याने दोन-तीन शेळ्यांही मेल्यात. आता जगायचं तरी कसं ? हातात दमडी नाय आण शेतात पीक नाय ?,’’ हे हृदयाला पिळवटून टाकणारे बोल सत्तरीत असलेल्या गीताबाई काळे यांचे आहेत. त्या त्यांचे धनी माणिक काळे यांच्यासोबत शेतात जीवन जगत आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात चव्हाणवाडी हे छोटंसं खेडे आहे. त्यामध्ये सत्तर-ऐंशी वर्षांचे जोडपे आपली गुजराण शेती आणि शेळीपालन करून करत आहेत. त्यांनाही या पावसाने यंदा चांगलाच फटका दिला आहे. माणिक काळे आणि गीताबाई काळे हे जोडपे एकमेकांचे आधार असून, ते दोघे शेतातच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. यंदा त्यांना पावसामुळे शेतात पीक घेता आले नाही. सात-आठ शेळ्याही पाळून त्यावर गुजराण करीत आहेत. पावसाने यंदा त्यांचे आर्थिक गणितच कोलमडून गेले आहे. घरात असलेले धान्य पाण्याने भिजून गेले. शेळ्यांना योग्य आसरा नसल्याने पावसात दोन-तीन शेळ्यांनी आपला जीव गमावला. दोघांनाही आता इकडून-तिकडून मागून पोटाची खळगी भरावी लागत आहे. कारण त्यांची मुले त्यांच्यासोबत राहत नाहीत. शेतात तर काहीच राहिले नसल्याने अन्न विकत घ्यायलाही पैसे नाहीत. परिणामी त्यांच्यावर भीक मागायची वेळ आली आहे.
पावसाने आहे ते संपवलंय...
सुनीता भोसले या ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या असून, त्या म्हणाल्या, हे दोघेही स्वत: कमवून आयुष्य जगणारे जोडपे आहे. परंतु, यंदा पावसाने त्यांना झोडपले आहे. त्यांच्याकडे ना शेतात काही आहे, ना घरात. त्यांच्यावर आता भीक मागायचीच पाळी आली आहे.