लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:43 AM2023-07-10T09:43:05+5:302023-07-10T09:44:24+5:30
मनसेच्या ‘एक सही संतापाची’ मोहिमेत मतदारांचा प्रचंड संताप दिसून आला
शिवणे : महाराष्ट्रात विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर राजकारणाच्या महानाट्याला सुरुवात झाली. इतिहासात नोंद होईल असे जबरदस्त धक्के राजकारणात दिसून आले. मी या पक्षासोबत कधीच जाणार नाही, मी यांच्याबरोबर कधीही सत्ता स्थापन करणार नाही असं म्हणणारे आता एकत्र आल्याचे दिसून आले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर तर नाट्यसत्तांतर पुन्हा सुरु झाले आहे. आता मतदारांसमोर निवडणुकीबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. कोणाला मतदान करावे या संभ्रमात मतदार सध्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेने नवीनच मोहीम हाती घेतली. राज्यात ‘एक सही संतापाची’ या मोहिमेचे आयोजन केले होते.
महाराष्ट्राच्या दलबदलू राजकारणामुळे जो चिखल झाला आहे, त्याचा नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे, याच संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी पुण्यातही ‘एक सही संतापाची’ ही माेहीम हाती घेतली. या माेहिमेत ज्यांना सही येत नाही अशा ज्येष्ठ महिलांनीही ‘अंगठा’ उमटवून आपला संताप व्यक्त करीत आहेत. अलीकडेच वारजे येथे हा उपक्रम सुरू असताना एक आजी आल्या, मला लिहिता येत नाही; पण फक्त सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप आहे म्हणून मी अंगठा उमटवयाची इच्छा व्यक्त केली. तशीच भावना नाना पेठेतील कबीर चाैकात आयाेजित ‘एक सही संतापाची’ उपक्रमात सहभागी झालेल्या महिलेने व्यक्त करत आपला अंगठा उमटवला.