‘कॅप’च्या विद्यार्थ्यांना दिलासा; चुका करणार्या महाविद्यालयांना दुप्पट दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:37 PM2017-10-16T14:37:29+5:302017-10-16T14:41:35+5:30
‘कॅप’च्या आॅनलाईन प्रक्रियेत नावनोंदणी न केलेल्या महाविद्यालयांना दंड आकारून संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरण्याचा तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
पुणे : अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत (कॅप) प्रवेश निश्चित होवून महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे डोक्यावर टांगती तलवार असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आॅनलाईन प्रक्रियेत नावनोंदणी न केलेल्या महाविद्यालयांना दंड आकारून संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरण्याचा तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
दहावी व बारावीनंतर प्रथम वर्ष पदविका आणि थेट द्वितीय वर्ष दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेमध्ये ‘कॅप’ फेर्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत. ‘कॅप’ गुणवत्ता यादी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे आवश्यक असते. त्यानुसार महाविद्यालयाकडून संबंधित विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी करून प्रवेश अंतिम करणे बंधनकारक असते. महाविद्यालयाकडून आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश अंतिम होत नाही. मात्र, अनेक महाविद्यालयांकडून यामध्ये हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला होता.
आॅनलाईन नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांच्या चुकीमुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. विद्यार्थ्यांची चूक नसतानाही त्यांना प्रवेशास मुकावे लागू नये यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या बैठकीत संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाविद्यालयांना संबंधित विद्यार्थ्यांची आॅनलाईन प्रवेश नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडून प्रति विद्यार्थी ६ हजार रूपये दंड घेतला जाणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांकडून वसुल न करता संस्थेने स्वत: भरावी, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. विनानुदानित संस्थासोबत शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांनाही हा दंड भरावा लागणार आहे. या नोंदणीसाठी दि. १७ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, कॅप फेरी व्यतिरिक्त संस्था स्तरावरील प्रवेशाची आॅनलाईन नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मात्र रद्द केले जाणार आहे.
संस्थांनी निष्काळजीपणा केल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले नाहीत. आॅनलाईन नोंदणी न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरले जाणार नव्हते. यात विद्यार्थ्यांची चूक नसल्याने संस्थांना दंड आकारून नोंदणीची संधी देण्यात आली आहे. राज्यभरात असे जवळपास शंभराहून अधिक विद्यार्थी असतील.
- दयानंद मेश्राम, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय